सिद्धान्तला विजेतेपद
By admin | Published: May 24, 2016 04:06 AM2016-05-24T04:06:50+5:302016-05-24T04:06:50+5:30
महाराष्ट्राचा अव्वल मानांकित सिद्धान्त बांठियाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम राखताना सच्चित शर्माचा २-०ने धुव्वा उडवून १६ वर्षांखालील १०व्या रमेश देसाई राष्ट्रीय
मुंबई : महाराष्ट्राचा अव्वल मानांकित सिद्धान्त बांठियाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम राखताना सच्चित शर्माचा २-०ने धुव्वा उडवून १६ वर्षांखालील १०व्या रमेश देसाई राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.
महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईच्या डॉ. जी.ए. रानडे टेनिस संकुलात झालेल्या या स्पर्धेत सिद्धान्तने अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ करताना सच्चितला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पहिल्याच सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखताना सिद्धान्तने ६-१ अशी बाजी मारून सामन्यात आघाडी घेतली. यानंतर सच्चितने काही प्रमाणात प्रतिकार करताना सिद्धान्तला कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला.
परंतु, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सिद्धान्तने सामन्यावरील आपली पकड न सोडता ६-३ असा विजय मिळवून स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. त्याचवेळी मुलींमध्ये तेलंगणाच्या ए. शिवानीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत गुजरातच्या वैदेही चौधरीचा ६-४, २-६, ७-६ असा पाडाव करून जेतेपद पटकावले. मुलांच्या दुहेरीत अमित बेनिवाल - सच्चित शर्मा यांनी बाजी मारताना रिषभ शारदा - एन. केल्वीन यांचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. तर ए. शिवानी - शिवानी एस. यांनी मुलींचे दुहेरी जेतेपद मिळवताना प्रींकल सिंग - वैदेही यांचे आव्हान ६-१, ४-६, १०-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)