आंबेगावमधील ४४ कुस्तीगीरांची निवड
By admin | Published: November 2, 2016 01:22 AM2016-11-02T01:22:58+5:302016-11-02T01:22:58+5:30
पोखरी (ता.आंबेगाव) येथे नुकत्याच तालुका पातळीवरील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
डिंभे : आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ व पोखरी ग्रामस्थांच्या वतीने पोखरी (ता.आंबेगाव) येथे नुकत्याच तालुका पातळीवरील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण सहभागी झालेल्या ८७ पहिलवानांपैकी ४४ पहिलवानांची वजनगटानुसार जिल्हा पातळीवरील स्पर्धांसाठी निवड झाली असून, या स्पर्धा पुण्यातील मारुंजी येथे पार पडणार आहेत. विजयी पहिलवानांस जिल्हा कुस्ती स्पर्धेत आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखरी येथे आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ व पोखरी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि.३१) आंबेगाव तालुका केसरी निवडचाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धामध्ये तालुक्यातून एकूण ९५ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. कुमारगटातील १४ वयोगट, १७ वयोगटामध्ये व वरिष्ठगट गादी व माती विभाग याप्रमाणे २५ किलो वजनापासून १२५ किलो वजनापर्यंत या स्पर्धा खेळविण्यात आल्या. वयोगट व वजनानुसार पार पडलेल्या या स्पर्धामध्ये एकूण ४४ पहिलवान जिल्हा पातळी निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागातील होतकरू कुस्तीगीरांना या स्पर्धेमुळे जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळाली असून, प्रथमत:च तालुक्याच्या पश्चिम भागात निवडचाचणी कुस्ती स्पर्धा भरविल्याने ग्रामीण भागातील अनेक कुस्तीगीर या स्पर्धांत सहभागी झाले होते.
पोखरी येथे पार पडलेल्या आंबेगाव तालुका निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्याक्ष मारुती भवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे, राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, मधूअप्पा बोऱ्हाडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, पुणे जिल्हा परिषद उपसभापती व शिवसेना नेते अरुण गिरे, पोखरीचे उपसरपंच राहुल भागीत, तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. राजेंद्र पाबळे, उपाध्यक्ष पै. विलास टेमगिरे, कार्यवाह पै. चिंतामण कोळप, पुणे जिल्हा विभागीय समिती सदस्य शरद गाडे, इत्यादी मान्यवर व विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते, परिसरातील माजी नामांकित पहिलवान व पोखरी ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)