अनिल कुंबळेंबरोबर कुठलेही मतभेद नाहीत - विराट कोहली
By admin | Published: June 3, 2017 08:20 PM2017-06-03T20:20:53+5:302017-06-03T20:20:53+5:30
मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबरोबर माझे कुठलेही मतभेद नाहीत. माझ्यात आणि प्रशिक्षकांमध्ये बेबनाव झाल्याच्या सध्या सुरु असलेल्या बातम्या निव्वळ अफवा आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 3 - मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबरोबर माझे कुठलेही मतभेद नाहीत. माझ्यात आणि प्रशिक्षकांमध्ये बेबनाव झाल्याच्या सध्या सुरु असलेल्या बातम्या निव्वळ अफवा आहेत असे कर्णधार विराट कोहलीने शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीने मतभेदांच्या बातम्यांचे खंडन केले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने रविवारपासून भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अभियानाला सुरुवात होणार आहे.
ड्रेसिंग रुमशी संबंध नसताना अनेकांनी ब-याच गोष्टी लिहील्या आहेत. विविध तर्क-विर्तक लावले आहेत. ड्रेसिंगरुममध्ये अशी कुठलीही समस्या नाही. लोक उगाचच वाद का निर्माण करतात ते मला कळत नाही ? संघाचे सर्व लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आहे असे कोहलीने या वादासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
काही दिवसांपूर्वी कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज असल्याचे वृत्त आले होते. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर असणारे सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या वादामध्ये कुंबळे आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समेट घडवून आणणार असल्याचे बोलले जात होते.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कुंबळे यांनी संघाच्या इन्डोअर सरावादरम्यान कर्णधार कोहलीकडून थ्रोडाऊनचा सराव करुन घेतला. कोहली एकाग्रचित्ताने फलंदाजी करीत होता. कुंबळे कर्णधाराला थ्रोडाऊनचा सराव देत होते, हे या सत्राचे विशेष आकर्षण होते. कोहलीने सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने फलंदाजीचा सराव केला. सत्रादरम्यान त्यांच्यादरम्यान मतभेद आहेत, असे निदर्शनास आले नाही. ड्राईव्हचा सराव केल्यानंतर कोहलीने काही स्केअर आॅफ द विकेट फटके खेळण्याचा सराव केला. कुंबळेने कर्णधारासोबत जवळजवळ २० मिनिटे वेळ घालविल्यानंतर दुसऱ्या नेट््सकडे मोर्चा वळवला.