संधी आहे; मात्र आव्हान खडतर...

By admin | Published: July 20, 2016 04:53 AM2016-07-20T04:53:27+5:302016-07-20T04:53:27+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळण्याची सर्वाधिक संधी असलेला खेळ म्हणजे ‘टेनिस’.

There is a chance; The only challenge is to ... | संधी आहे; मात्र आव्हान खडतर...

संधी आहे; मात्र आव्हान खडतर...

Next


रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळण्याची सर्वाधिक संधी असलेला खेळ म्हणजे ‘टेनिस’. सध्याचा सर्वांत अनुभवी व दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि जागतिक महिला दुहेरी क्रमवारीतील अव्वल सानिया मिर्झा यांच्यामुळे भारताला आॅलिम्पिक पदकासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात आहे. असे असले, तरी पदक मिळविण्यासाठी ४ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाला खडतर मेहनत घ्यावी लागेल.
काही प्रमाणात वादाचे पडसाद उमटलेल्या भारतीय संघातील खेळाडूंच्या भूमिकेमुळे भारतासाठी पदक मिळविणे दिसते तेवढे सोपे नाही. पुरुषांच्या दुहेरीत लिएंडर पेस-रोहन बोपन्ना अशी अनुभवी जोडी भारताच्या वतीने खेळविण्यात येणार असून, दुसरीकडे महिला दुहेरी गटात सानिया नवख्या प्रार्थना ठोंबरेच्या साथीने खेळेल. तर, मिश्र दुहेरीत सानिया-बोपन्ना ही जोडी खेळणार आहे.
मुळात ज्या गटात भारताला पदकाची सर्वाधिक संधी आहे, त्या मिश्र दुहेरीमध्ये सानिया-पेस अशी बलाढ्य जोडी अपेक्षित होती. मात्र, साथीदार निवडण्याचा अधिकार मिळालेल्या सानियाने बोपन्नाची निवड केली. यामागे २०१२मध्ये झालेल्या लंडन आॅलिम्पिक वादाचे कारण स्पष्ट दिसून येते. लंडन आॅलिम्पिकच्या वेळी झालेल्या वादामध्ये ‘माझा केवळ एका मोहऱ्याप्रमाणे वापर करण्यात आला होता,’ अशी स्पष्ट नाराजी सानियाने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली.
त्या वेळी पेस व महेश भूपती या दिग्गजांमधील वादाचा फटका सानियाला बसला होता. तर, या वेळी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सानियाने साथीदार निवडीच्या मिळालेल्या हक्काच्या जोरावर जोडीदार निवडला. पण, यामध्ये कदाचित भारताला फटका बसू शकतो. शेवटी काहीही झाले, तरी आॅलिम्पिक इतर स्पर्धांच्या तुलनेत अधिक खडतर स्पर्धा आहे आणि तीमध्ये पदक जिंकणारा पेस हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, हे विसरता कामा नये.
१९९६मध्ये अ‍ॅटलांटा आॅलिम्पिकमध्ये पेसला पुरुष एकेरीमध्ये अमेरिकेच्या आंद्रे अगासीविरुद्ध पराभूत व्हावे लागले. मात्र, कांस्यपदक निश्चित करताना पेसने भारतीय क्रीडा जगतामध्ये नवा इतिहास लिहिला. कुस्तीमध्ये १९५२मध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्य पटकावल्यानंतर पेसचे पदक भारताचे आॅलिम्पिकमधील केवळ दुसरे वैयक्तिक पदक होते. त्याच वेळी यंदा तो विक्रमी सातव्या आॅलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे.
दुसरीकडे, पुरुष दुहेरीतील पेसचा साथीदार रोहन बोपन्नाकडेही दीर्घ अनुभव आहे. जागतिक क्रमवारीतील १०व्या स्थानी असलेला बोपन्ना वेगवान खेळ करण्यात माहीर आहे. पेस-बोपन्ना यांचा खेळ एकाच वेळी बहरला, तर त्यांना रोखणे प्रतिस्पर्ध्यांना सोपे जाणार नाही.
त्याच वेळी महिला गटात पूर्णपणे सानिया मिर्झावर भारताची मदार असेल. भारताची द्वितीय क्रमांकाची खेळाडू २२ वर्षीय प्रार्थना ठोंबरे पहिल्यांदाच आॅलिम्पिक खेळणार असून, सानियासह जगातील अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळण्याचे मोठे आव्हान तिच्यापुढे असेल. मिश्र दुहेरी गटातही सानिया-बोपन्ना यांना पदकाची संधी आहे. सानिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, अनुभवी बोपन्नाच्या वेगवान खेळाची तिला मदत होईल. एकूणच, यंदा आॅलिम्पिकमध्ये पदक निश्चित करण्यासाठी टेनिस ‘स्मॅश’ भारतासाठी निर्णायक ठरेल.

- रोहित नाईक, मुंबई
>भारतीय संघ :
पुरुष दुहेरी : लिएंडर पेस-रोहन बोपन्ना
महिला दुहेरी : सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे
मिश्र दुहेरी : रोहन बोपन्ना-सानिया मिर्झा

Web Title: There is a chance; The only challenge is to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.