विराटकडून बरेच काही शिकण्यासारखे : विल्यम्सन

By admin | Published: September 14, 2016 05:19 AM2016-09-14T05:19:15+5:302016-09-14T05:19:15+5:30

सध्या वर्तमान क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडचा कर्णधार व मुख्य फलंदाज केन विल्यम्सनने महान खेळाडू असल्याचे म्हटले आहे

There is a lot to learn from the hero: Williamson | विराटकडून बरेच काही शिकण्यासारखे : विल्यम्सन

विराटकडून बरेच काही शिकण्यासारखे : विल्यम्सन

Next

नवी दिल्ली : सध्या वर्तमान क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडचा कर्णधार व मुख्य फलंदाज केन विल्यम्सनने महान खेळाडू असल्याचे म्हटले आहे. भारतीय कर्णधाराला खेळताना बघून बरेच काही शिकायला मिळाले, अशी कबुली विल्यम्सनने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला विल्यम्सन पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘‘विराट महान खेळाडू असून त्याच्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याची क्षमता आहे. विराट प्रेरणादायी आहे. त्याला खेळताना बघणे आवडते. त्याच्यासारख्या खेळाडूकडून बरेच काही शिकायला मिळते.’’
वर्तमान क्रिकेटमध्ये विल्यम्सन व कोहली यांच्याव्यतिरिक्त ज्यो रुट व स्टिव्ह स्मिथ जागतिक क्रिकेटमध्ये चार सर्वोत्तम फलंदाज आहेत. चारही खेळाडूंची आपापली बाजू मजबूत असल्याचे विल्यम्सनने म्हटले आहे.
आतापर्यंत ५१ पेक्षा अधिक सरासरी राखताना १४ शतकांच्या मदतीने ४३९३ धावा फटकावणारा २६ वर्षीय विल्यम्सन म्हणाला, ‘‘माझ्यासह स्मिथ व रुट आणि विराट वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत. आमची काही बलस्थाने आहेत. आपल्या रणनीतीवर कायम राहणे, हा या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या पद्धतीने खेळतो आणि यशस्वी ठरतो.’’
कर्णधारपद आणि फलंदाजी यामध्ये ताळमेळ साधताना कुठली अडचण भासत नसल्याचे विल्यम्सनने स्पष्ट केले. विल्यम्सन गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. त्याने या टी-२० लीगची प्रशंसा केली. आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत जुळलेले आहे. मैदानावर चुरस अनुभवायला मिळणे, या स्पर्धेची विशेषता आहे. या स्पर्धेच्यानिमित्ताने अनेकांना ओळखण्याची संधी मिळते. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या संपर्कात येणे या स्पर्धेची सकारात्मक बाब आहे. आयपीएल शानदार स्पर्धा असून त्यात आमचे अनेक खेळाडू सहभागी होतात.


फिरकीला सामोरे जाणे अडचणीचे : हेसन
न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी ‘रविचंद्रन आश्विन अँड कंपनी’ला सामोरे जाणे थोडे अडचणीचे आहे, अशी कबुली न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन व प्रशिक्षक माईक हेसन यांनी दिली. त्याचप्रमाणे आमच्या फिरकीपटूंना कुकाबुरा चेंडूपासून ‘एसजी टेस्ट’ चेंडूसोबत झटपट ताळमेळ साधणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी मालिकेत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विल्यम्सन म्हणाला, ‘‘गेल्या मालिकेत फिरकीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. काही वेळा तर फलंदाजी करणेही कठीण झाले होते. फिरकी खेळताना थोडी अडचण भासते, यात शंकाच नाही. आमच्या संघातही तीन दर्जेदार फिरकीपटू आहेत. भारताविरुद्ध भारतात खेळणे मोठे आव्हान आहे. संघ म्हणून येथे खेळण्याबाबत उत्सुकता आहे.’’
प्रशिक्षक हेसन म्हणाले, ‘‘उपखंडातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी तयारी करणे कठीण आहे. आम्ही बुलावायोमध्ये बराच वेळ घालवला. त्या मालिकेत फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि खेळपट्टीही संथ होती. तेथील खेळपट्टी भारतातील खेळपट्ट्यांप्रमाणे होती. अशी परिस्थिती मायदेशात निर्माण करणे कठीण आहे.’’

Web Title: There is a lot to learn from the hero: Williamson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.