नमस्कारासाठी चमत्कार करावा लागतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 05:39 AM2016-09-18T05:39:09+5:302016-09-18T05:39:09+5:30
भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले.
भुवनेश्वर : दीपा कर्माकर तसेच रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि कांस्यपदक विजेती साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये धवल कामगिरी केल्यानंतर बक्षिसाचा वर्षाव झाला, हे स्वाभाविकच होते, कारण भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले.
भारतीय क्रीडा पत्रकार संघाच्या ३९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात दीपा आणि नंदी यांना सन्मानित करण्यात आले. दीपा आणि पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही सिंधू यांना आॅलिम्पिक स्पर्धेनंतर कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्यात आली, यावर काही लोकांनी खेळाडूंना हा पैसा खेळाडूंना आॅलिम्पिकच्या अगोदर मिळाला असता तर आणखी चांगली कामगिरी झाली असती असे म्हंटले असते. मात्र नंदी यांना हे
म्हणणे मान्य नाही, हा मुद्दा खोडून काढताना ते म्हणाले, भारतात पहिल्यांदा चमत्कार करुन दाखवावा लागतो, नंतरच लोक नमस्कार करतात. काही तरी चमत्कार
करुन दाखवल्यानंतरच समाजाकडून तुमची दखल घेतली जाते. सर्वोच्च स्तरावर खेळाडूने स्वत:ला सिध्द केल्यास प्रसारमाध्यमे त्या खेळाडूबद्दल लिहतात, त्यानंतरच त्याला बक्षिस मिळते, हे स्वाभाविक आहे.
आॅलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर यांना स्पर्धेनंतर बीएम डब्ल्यू कार, फ्लॅटसह कोट्यवधींची रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली होती. यावर माजी हॉकीपटू दिलीप तिर्कीसह अन्य खेळाडूंनी हा पैसा खेळाडूंना स्पर्धेपूर्वी मिळायला हवा होता असे म्हंटले होते.
(वृत्तसंस्था)