पहिल्या दोन वन-डेसाठी विंडीज संघात बदल नाही
By admin | Published: June 21, 2017 01:02 AM2017-06-21T01:02:39+5:302017-06-21T01:02:39+5:30
वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका १-१ ने बरोबरीत सोडविणाऱ्या १३ सदस्यांच्या संघात भारताविरुद्धच्या पहिल्या दोन लढतींसाठी कुठलाही बदल केलेला नाही.
पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका १-१ ने बरोबरीत सोडविणाऱ्या १३ सदस्यांच्या संघात भारताविरुद्धच्या पहिल्या दोन लढतींसाठी कुठलाही बदल केलेला नाही. यजमान संघ अव्वल वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियलविना खेळणार आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी ग्रॅब्रियल सध्या रिहॅबिलिटेशन करीत आहे.
वेगवान गोलंदाज जेसन होल्डच्या नेतृत्वाखालील जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या विंडीज संघासाठी ही महत्त्वाची मालिका आहे. कारण अव्वल आठ संघ २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. संघाची कामगिरी निराशाजनक झाली तर त्यांना विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल. भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेची सुरुवात त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हलवर शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीने होणार आहे. वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर ९ जुलै रोजी दोन्ही संघात एकमेव टी-२० सामना खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)