आयपीएल सामन्यांसाठी पिण्याचे पाणी नाही
By admin | Published: April 9, 2016 04:05 AM2016-04-09T04:05:32+5:302016-04-09T14:36:22+5:30
आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल, पण या सामन्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे
मुख्यमंत्री : सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल
मुंबई : आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल, पण या सामन्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयातही हीच बाजू मांडण्यात येणार असल्याने राज्यात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
आयपीएलच्या शनिवारी मुंबईत होणाऱ्या शुभारंभी सामन्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. मुंबईसह नागपूर आणि पुणे येथेही खेळल्या जाणाऱ्या २0 सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वापरले जाणार असल्याने हे सामने राज्याबाहेर हलवावेत, अशी याचिका एका एनजीओने उच्च न्यायालयात केली आहे. राज्य सरकार, आयपीएलच्या आयोजकांवर ताशेरे ओढताना आयपीएलसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
>पाणी नेमके कुठले?
आयपीएल सामन्यांसाठीचे पाणी हे पिण्याचे आहे की इतर वापरासाठीचे अशी विचारणा न्यायालयाने महापालिका व राज्य शासनाला केली असून, त्यावर राज्य शासन काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. बीसीसीआयने मात्र, मैदानांच्या देखभालीसाठीचे पाणी पिण्याचे नसते अशी भूमिका मांडली आहे.