कोच बनण्याची घाई नाही - द्रविड

By admin | Published: April 7, 2016 02:04 AM2016-04-07T02:04:17+5:302016-04-07T02:04:17+5:30

भारतीय सीनियर संघाचा मुख्य कोच बनण्याची मला घाई नाही. पद सांभाळण्यासाठी क्षमता आणि वेळ आहे का, या दोन गोष्टींवर कोचपदाचा निर्णय अवलंबून असेल, असे माजी कर्णधार राहुल द्रविड याने बुधवारी स्पष्ट केले.

There is no hurry to become coach - Dravid | कोच बनण्याची घाई नाही - द्रविड

कोच बनण्याची घाई नाही - द्रविड

Next

नवी दिल्ली : भारतीय सीनियर संघाचा मुख्य कोच बनण्याची मला घाई नाही. पद सांभाळण्यासाठी क्षमता आणि वेळ आहे का, या दोन गोष्टींवर कोचपदाचा निर्णय अवलंबून असेल, असे माजी कर्णधार राहुल द्रविड याने बुधवारी स्पष्ट केले.
संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यासोबतचा बीसीसीआयचा करार टी-२० विश्वचषकासोबतच संपुष्टात आल्याने द्रविड कोच बनू शकतो,
असे वृत्त आले होते. द्रविडने मात्र यासंदर्भात ठोस उत्तर दिले नाही. तो म्हणाला, ‘‘कोच बनण्याची क्षमता आहे, असे वाटले तरच मी या पदासाठी होकार देईन.’’
४३ वर्षांचा द्रविड सध्या भारतीय अ संघाचा, तसेच १९ वर्षांखालील संघाचा कोच असून दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मेंटॉर आहे. कोच बनण्याच्या शक्यतेबाबत विचारताच तो म्हणाला, ‘‘कोच बनणे हा अनुभव आहे. तुम्ही परिपूर्ण कोच आहात किंवा नाही, हे अनुभवावरून कळते. मी हे पद स्वीकारण्याआधी अनेकदा विचार करणार आहे. आपल्याला पद सांभाळायचे आहे, म्हणून निर्णय घेणे योग्य नाही. मी या पदाला न्याय देऊ शकेल का, याचा विचारही होणे गरजेचे आहे. तुमचे शंभर टक्के लक्ष कामावर असू शकते का, हा विचार कृतीत उतरविणे गरजेचे आहे.’’
द्रविड म्हणाला, ‘‘कोचचे यश म्हणजे काय हे निकालावर विसंबून नसते. तुम्ही या कामात समर्पितपणे वेळ देऊ शकता का, या गोष्टीला महत्त्व आहे. चांगला फलंदाज बनण्यासाठी मी किती बलिदान दिले, याची जाणीव आहे. कोचिंग एक प्रक्रिया असून यात दररोज नवनवीन शिकायला मिळते. मी या कामात युवा आहे. खेळाडू असताना अनेक गोष्टींचा विचार मनात डोकावत नव्हता. कर्णधार म्हणून डावपेच आखत होतो. पण कोच जितका विचार करतो, तितका विचार खेळाडू करूच शकत नाही. खेळाडूपेक्षा कैकपटींनी कोचला विचारमग्न होऊन काम करावे लागते. चुका झाल्यास हे काम वेगळ्या पद्धतीने होऊ शकले असते याचीही जाणीव होते.’’ ज्युनियर विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवाची आठवण सांगताना द्रविड म्हणाला, ‘‘निकाल बाजूला ठेवला तरी यापेक्षा वेगळे काही करू शकलो असतो, असे कोच म्हणून वाटायला लागले आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: There is no hurry to become coach - Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.