आयसीसी विश्व एकादशमध्ये एकही भारतीय नाही
By admin | Published: March 30, 2015 11:58 PM2015-03-30T23:58:24+5:302015-03-30T23:58:24+5:30
आयसीसी विश्वकप एकादशमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नसून ब्रेन्डन मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील या संघात चॅम्पियन आॅस्ट्रेलियाऐवजी
दुबई : आयसीसी विश्वकप एकादशमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नसून ब्रेन्डन मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील या संघात चॅम्पियन आॅस्ट्रेलियाऐवजी न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्चस्व आहे. आयसीसी संघात न्यूझीलंडच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडला अंतिम लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ विकेट््सने पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
आयसीसीने स्पष्ट केले, ‘आक्रमक व प्रेरक कर्णधारपदाच्या शैलीसाठी मॅक्युलमची कर्णधारपदी निवड करण्यात आली.’ मॅक्युलमने ९ सामन्यांत १८८.५० च्या स्ट्राईक रेटने ३२८ धावा फटकावल्या. निवड समितीने विश्वकप स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर या संघाची निवड केली. मॅक्युलमव्यतिरिक्त न्यूझीलंडचे कोरी अॅण्डरसन, ट्रेन्ट बोल्ट, मार्टिन गुप्तिल व डॅनियल व्हेटोरी यांचाही या संघात समावेश आहे; तर आॅस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ आणि
मिशेल स्टार्क यांना संघात स्थान मिळाले आहे.
दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स आणि मोर्नी मॉर्केल यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा याला संघात स्थान मिळाले आहे. सहा सामन्यांत ४३३ धावा फटकावणारा झिम्बाब्वेचा ब्रेन्डन टेलर १२ वा खेळाडू आहे. समितीचे
अध्यक्ष असलेले आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) ज्योफ अलार्डिस म्हणाले, की भारताचे वेगवान गोलंदाज उमेश यादव व मोहम्मद शमी आणि आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत होते.
अलार्डिस म्हणाले, ‘‘संघाची निवड करणे कठीण होते. समितीने अनेक खेळाडूंच्या नावांचा विचार केला. त्यात फलंदाज महमुदुल्ला (बांगलादेश), शैमन अन्वर (यूएई), यादव व शमी (भारत), वहाब रियाज (पाकिस्तान), इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) आणि आर. आश्विन (भारत) आदींचा समावेश आहे. स्पर्धेत अनेकांनी छाप सोडली, पण सर्वांना संघात स्थान मिळणे शक्य नव्हते. समितीने संघाची निवड करताना समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा संघ जगातील कुठल्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम आहे.’’ (वृत्तसंस्था)