१ मे नंतर महाराष्ट्रात IPL नाही - सुप्रीम कोर्टाचा MCAला झटका
By admin | Published: April 27, 2016 12:45 PM2016-04-27T12:45:01+5:302016-04-27T13:13:02+5:30
१ मे नंतर आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने एमसीएला मोठा धक्का बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीेलचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने एमसीएला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता, त्याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने २२ एप्रिल (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत १ मे नंतर राज्यात सामने खेळू देण्यास नकार दर्शवला.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळवायला मनाई केली होती. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली. एका दिवसात विशाखापट्टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मेचा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाकडे मागितली होती, त्यावर सुनावणी करताना न्यायालायने हा सामना पुण्यात खेळू देण्यास परवानगी दिली होती.