भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही

By admin | Published: September 21, 2016 05:02 AM2016-09-21T05:02:04+5:302016-09-21T05:02:04+5:30

आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली

There is no Maharashtrian in the Indian team | भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही

भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही

Next

मुंबई : आगामी ७ आॅक्टोबरपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली. परंतु, एकाही मराठी खेळाडूची संघात वर्णी न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच वेळी गुजरातचा खेळाडू किरण परमारची संघात वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी प्रो-कबड्डी लीगसह अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली असल्याने किमान एक तरी मराठी खेळाडू संघात असणे आवश्यक होते, अशी खंत व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या मातीतला खेळ, अशी ओळख असलेल्या कबड्डीच्या राष्ट्रीय संघात एकाही मराठी खेळाडूची निवड न झाल्याने महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली. दरम्यान, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा स्टार खेळाडू अनुप कुमारकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून, अष्टपैलू मनजित चिल्लरची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.
राष्ट्रीय निवड शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, विशाल माने, गिरीश एर्नाक आणि सचिन शिंगाडे यांचा समावेश होता. शिवाय राष्ट्रीय शिबिरामध्ये अंतिम क्षणी परमारचा प्रवेश झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलीे. दरम्यान, याबाबत भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे (एकेएफआय) सचिव दिनेश पटेल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संघनिवडीबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले. त्याच वेळी यजमान म्हणून गुजरातचा खेळाडू संघात असणे यात काही गैर नसल्याचे मतही या वेळी व्यक्त होत आहे. दुसरीकडे भारतीय संघात हरियाणाच्या एकूण ४ खेळाडूंनी संघात स्थान मिळवले आहे. तर, रेल्वेच्या ३ खेळाडूंनी स्थान मिळवताना आपली चमक दाखवली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते संघाच्या जर्सीचे
अनावरण करण्यात आले. तसेच, कपिलदेव यांनी कर्णधार अनुप कुमारला काही मोलाच्या टिप्स देताना संघाचे मनोबलही उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)
>.. आणि कपिलदेव भडकले
एकूण १२ देशांचा सहभाग असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर
कपिलदेव चांगलेच भडकले. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या या प्रश्नाचा कपिलदेव यांनी चांगलाच समाचार घेताना म्हटले, ‘‘हा प्रश्न याठिकाणी उपस्थित आवश्यक होते का? जर तुम्ही भारतीय असाल, तर तुम्ही हा प्रश्न विचारूच शकत नाही.’’
राष्ट्रीय निवड चाचणीतून सर्वोत्तम खेळाडूंची निवड झाली असून, यामध्ये राज्यानुसार निवड झालेली नाही. काही प्रमाणात खेळाडूंमध्ये असलेला थोडाफार फरक हेच निर्णायक ठरले. सर्वच खेळाडू निर्णायक आहेत. यंदाची स्पर्धा अत्यंत कठीण व तगडी असेल. त्यामुळे अंदाज लावणे कठीण असेल, अशी प्रतिक्रिया भारताचे प्रशिक्षक बलवान सिंग आणि के. भास्करन यांनी या वेळी दिली.
>महाराष्ट्राचा खेळाडू राष्ट्रीय संघात नसणे हे निश्चित निराशाजनक आहे. यातून तरी राज्य संघटनेने बोध घ्यावा. तसेच रोहित कुमारची न झालेली निवड धक्कादायक ठरली. सॅग स्पर्धेत त्याचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला होता.
- राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते
>भारतीय संघ :
अनुप कुमार (कर्णधार), मनजित चिल्लर (उपकर्णधार), अजय ठाकूर, दीपक हुडा, धरमराज चेरालथन, जसवीर सिंग, किरण परमार, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा आणि सुरजित, बलवान सिंग आणि के. भास्करन (दोघेही प्रशिक्षक)

Web Title: There is no Maharashtrian in the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.