विशेष आमसभेसाठी सीओएच्या परवानगीची गरज नाही : राय
By admin | Published: March 30, 2017 07:41 PM2017-03-30T19:41:44+5:302017-03-30T19:41:44+5:30
प्रशासकांच्या समितीची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे महत्त्वाचे स्पष्टीकरण सीओए प्रमुख विनोद राय यांनी दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - बीसीसीआय अधिकाऱ्यांना विशेष आमसभा बोलविण्यासाठी प्रशासकांच्या समितीची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे महत्त्वाचे स्पष्टीकरण सीओए प्रमुख विनोद राय यांनी दिले आहे. आयपीएल संचालन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरात राय म्हणाले, विशेष आमसभा बोलविण्यासाठी बीसीसीआयला सीओएची परवानगी घेण्याची गरज नाही. पण आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळायला हवी. विशेष आमसभेत घेतलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध नसतील तर त्या निर्णयांनादेखील सीओएची मंजुरी मिळविणे अनिवार्य नाही. विशेष आमसभा ९ एप्रिललाच होईल का, असे विचारताच राय म्हणाले, यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राजजीव शुक्ला यांनी भूषविले. शुक्ला आयपीएल अध्यक्षपदी कायम राहतील, असे राय यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने राय यांना हटविण्याचे आदेश दिलेले नाहीत. जुनीच संचालन परिषद कायम असेल. बैठकीतून
काही अधिकारी वॉक आऊट करतील, अशी शंका होती का, या प्रश्नाच्या उत्तरात राय हसून म्हणाले, हा मीडियाचा प्रचार आहे.
बैठकीत कुठलाही कडवटपणा नव्हता, खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले. आयपीएल संचालन परिषदेच्या सदस्यांमध्ये पी. व्ही. शेट्टी, सौरभ गांगुली, सी. के. खन्ना आणि अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश होता. अमिताभ चौधरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. ज्योतिरादित्य शिंदे अनुपस्थित होते तर एम. पी. पांडोव हे ७० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्याने अपात्र घोषित करण्यात आले.
संचालन परिषदेचे निर्णय
मुंबईला मिळाला आयपीएल-१० चा प्ले आॅफ सामना. गतवर्षी दुष्काळामुळे मुंबईतील सामना इतरत्र हलविण्यात आला होता.
आयपीएल उद्घाटन समारंभात सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग या पाच माजी दिग्गजांचा सन्मान होणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंना एकरकमी गौरव निधी त्यांच्या शहरातील आयपीएल सामन्यादरम्यान वितरित करण्यात येईल.