आफ्रिदीच्या "ड्रीम टीम"मध्ये एकच भारतीय, न्यूझीलंड-इंग्लंडच्या खेळाडूंना स्थान नाही
By Admin | Published: June 5, 2017 04:37 PM2017-06-05T16:37:37+5:302017-06-05T18:24:53+5:30
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काल आपल्या वनडेच्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी, सौरव गांगुली...
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काल आपल्या वनडेच्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी, सौरव गांगुली तसेच सध्याचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळाले नाही. शाहिदने आपल्या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विशेष स्थान दिले आहे. शाहिदच्या संघात सचिन हा एकमेव भारतीय चेहरा आहे. शतकांच्या बादशहाला आपल्या संघात तो सलामीवीर म्हणून खेळवण्यास इच्छुक दिसतोय. सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर त्याने भारताकडून सलामीवीर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. सचिनसोबतच आफ्रिदिने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली असून गोलंदाजीमध्ये त्याने सहकारी वासीम आक्रम आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वार्नचा समावेश संघात केले आहे. शाहिद आफ्रिदीच्या ड्रीम टीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. वेस्ट इंडिज दोन, पाकिस्तान दोन आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारताच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आफ्रिदीच्या ड्रीम टीममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही हे विशेष...
अशी आहे आफ्रिदीची ड्रीम टीम
सचिन तेंडुलकर (भारत), अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकि पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), इंजमाम उल हक (पाकिस्तान), कुमार संगकारा (श्रीलंका), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), वासिम आक्रम (पाकिस्तान), शेन वार्न (ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)
आणखी वाचा : व्हिट्टोरीच्या ड्रीम टीममध्ये धोनीला स्थान नाही, विराट कर्णधार
आफ्रिदीने 398 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. अष्टपैलू आफ्रिदीच्या नावावर 8084 धावा आहेत. यामध्ये 6 शतकांचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीशिवाय आफ्रिदीने गोलंदाजीमध्ये 395 बळी मिळवले आहेत.