आॅस्ट्रेलियाचा दबाव नाही

By Admin | Published: February 22, 2017 01:36 AM2017-02-22T01:36:17+5:302017-02-22T01:36:17+5:30

आॅस्ट्रेलियाचा संघ गुणवान आहे. मात्र, आमच्यावर त्याचा दबाव नाही. इतर प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत आम्ही कांगारूंना जास्त

There is no pressure on Australia | आॅस्ट्रेलियाचा दबाव नाही

आॅस्ट्रेलियाचा दबाव नाही

googlenewsNext

पुणे : आॅस्ट्रेलियाचा संघ गुणवान आहे. मात्र, आमच्यावर त्याचा दबाव नाही. इतर प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत आम्ही कांगारूंना जास्त महत्त्व देत नाही, असे सांगत भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याविरुद्ध नैसर्गिक खेळ करतील, असे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी पुण्यात स्पष्ट केले.
भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर गुरुवारपासून (दि. २३) रंगणार आहे. दोन्ही संघांचा सराव जोरात सुरू असून मंगळवारी कुंबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘आॅस्ट्रेलियाचा संघ आमच्यासमोर आव्हान उभे करू शकतो. असे असले तरी, आमच्या कामगिरीवर विश्वास असल्याने त्यांचे दडपण अजिबातही नाही. आमच्या लेखी ते इतर संघांप्रमाणेच आहेत. आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करतो. मात्र, इतर मालिकांच्या तुलनेत या मालिकेला जास्त महत्त्व देणे मला योग्य वाटत नाही.’’ यापूर्वीच्या भारत दौऱ्यात कांगारूंचा ०-४ ने सुपडा साफ झाला होता. अलीकडे भारतीय संघाने न्यूझीलंड आणि इंग्लंडवर मालिका विजय नोंदविले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आता आॅस्ट्रेलियावरही मालिका विजय मिळविण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.
भारतीय संघ कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे कुंबळे यांनी सांगितले. ‘‘अलीकडे भारतात आम्ही खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांत आमच्यासमोर विविध आव्हाने होती. काही नव्या ठिकाणी आम्ही सामने खेळलो. तरीदेखील संघाने कामगिरीत सातत्य राखले. चेन्नईमध्ये इंग्लंडने पहिल्या डावात ५०० च्या आसपास धावा केल्या होत्या. त्या वेळी भारताला विजयाचा दावेदार मानले जात नव्हते. तरीही आम्ही जिंकलो. मुंबईत आम्ही नाणेफेक गमावल्यावर इंग्लंडने ४०० धावा केल्या. तेथे आम्ही डावाने विजय मिळविला. कोलकात्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भिन्न परिस्थितीतही वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. थोडक्यात, एका चॅम्पियन संघाकडून जे अपेक्षित आहे, तशीच कामगिरी टीम इंडियाने केलीय,’’ असे कुंबळे म्हणाले.

टीम इंडिया स्वावलंबी झालीय...

खेळपट्टी वा वातावरणामुळे चिंतीत न होता आपल्या कामगिरीवर विश्वास असणारा संघ तयार करण्याला आमचे प्राधान्य आहे. अर्थात ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. अलीकडे भारतीय संघाने मैदान तसेच मैदानाबाहेरच्या आव्हानांचा समर्थपणे सामना केलाय. कोहली अँड कंपनीचा सातत्यपूर्ण धडाका बघता कामगिरीच्या स्तरावर टीम इंडिया स्वावलंबी झाली आहे.
च्१० महिन्यांपासून मी या संघासोबत आहे. नव्या दमाच्या या संघाच्या प्रगतीतील सातत्य प्रशिक्षक म्हणून समाधान देणारे आहे. कुठलाही दबाव न ठेवता खेळाडू आपला नैसर्गिक खेळ करू शकेल, असे वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे नमूद करून यात यशस्वी ठरल्याबद्दल कुंबळे यांनी आनंद व्यक्त केला.


नाणेफेक महत्त्वाची नाही

वन-डे आणि टी-२० च्या तुलनेत कसोटीचा निकाल खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असतो. निकालाचा विचार करता नाणेफेकीचा कौल फार महत्त्वाचा नसतो. मागील दौऱ्यात चारही कसोटीत नाणेफेक जिंकूनही आम्ही पराभूत झालो होतो. ही मालिका अटीतटीची होईल, अशी आशा आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी व्यक्त केली.

भारतीयांना बाद करण्यासाठी घाम गाळावा लागेल : हेजलवूड
ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी वाटते. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू चांगली उसळी घेतो. भारतात मात्र वेगळी परिस्थिती असते. पुण्याची खेळपट्टीही त्याला अपवाद नसेल. त्यामुळे भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागेल. येथे चेंडू उसळणार नसल्याने फलंदाजांना बाद करण्यासाठी इतर पर्यायांवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. रिव्हर्स स्विंग, कटरचा जास्त वापर होईल. इतरही गोष्टींवर मी मेहनत घेतोय, त्याचा फायदा होईल, अशी आशा आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने व्यक्त केली.

आश्विनकडून शिकू शकतो : लियॉन
आॅस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नाथन लियॉन हा आश्विनच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला आहे. तो म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा गोलंदाज असून, सध्या तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकू शकतो. मी सध्या काय करतोय, हे आताच सांगणार नाही. मात्र, आमच्या संघासाठी टीम इंडियाच्या आव्हानांना सामोरे जाताना चांगले योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

आश्विनचे कौतुक
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी कसोटीत २५० बळी घेणारा गोलंदाज म्हणून रविचंद्रन आश्विनने विश्वविक्रम नोंदविला आहे. त्याचे कुंबळे यांनी भरभरून कौतुक केले. ‘‘सांघिकस्तरावर टीम इंडिया चांगली कामगिरी करीतच आहे. शिवाय खेळाडूंची वैयक्तिक कामगिरीदेखील उंचावली आहे. सध्याच्या संघातील अनेक खेळाडूंना ४० ते ४५ कसोटींचा अनुभव मिळाला आहे. कर्णधार विराट ५० पेक्षा जास्त कसोटी खेळलाय. आश्विनचे कौतुक करावे तितके कमी आहे.’’

मागील ८ महिन्यांत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जो खेळ केला, तोच या मालिकेत करू. आॅस्ट्रेलियाकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यांच्या आक्रमकतेला पर्यायी योजना आमच्याकडे तयार आहेत. स्मिथ अँड कंपनीच्या आव्हानांना सडेतोड उत्तर देण्यास भारतीय संघ समर्थ आहे.
- अनिल कुंबळे, प्रशिक्षक, भारत

Web Title: There is no pressure on Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.