कुंबळेबाबत काहीच अडचण नाही : कोहली
By admin | Published: June 4, 2017 06:00 AM2017-06-04T06:00:58+5:302017-06-04T06:00:58+5:30
भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कुठलाही वाद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्य प्रशिक्षकासोबत मला कुठलीच समस्या नव्हती
बर्मिंघम : भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कुठलाही वाद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्य प्रशिक्षकासोबत मला कुठलीच समस्या नव्हती आणि ही पूर्ण घटना केवळ अफवा आहे, असे कोहली म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सलामी लढतीपूर्वी पत्रकारांसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘बरीच चर्चा रंगविण्यात आली. जे लोक चेंज रुमचे सदस्य नव्हते त्यांनी बरेच काही लिहिले. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. असे काहीच घडले नाही.’
कुंबळेसोबत गेल्या मोसमातील प्रवास शानदार असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘कुठल्याही प्रकरणावर टिपणी करताना अचूक माहिती असणे आवश्यक आहे.’
कोहलीने मीडियावर भाष्य करताना म्हटले की, ‘ज्या बाबी मला माहीत नाहीत त्यावर मी भाष्य करणार नाही. माझ्या मते सध्या धैर्याची उणीव असून कुणीच आपली चूक कबूल करण्यास तयार नाही. जर मीडियाने काही बाबी लिहिल्या आणि त्या चुकीच्या ठरल्या तर मीडिया चूक कबूल न करता समस्येचे निवारण झाल्याचे वृत्त देईल. किमान आपली चूक झाली हे तर स्वीकारायला हवे.’
कोहलीने आमचा संघ एका कुटुंबाप्रमाणे असल्याचे सांगत यात एकमेकांच्या विचारावर असहमती असू शकते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
प्रशिक्षक निवडीसाठी एक प्रक्रिया असल्याचे सांगताना विराटने त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. महत्त्वाची स्पर्धा सुरू असताना काही लोक अफवा पसरवत आहेत. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मैदानावर दडपण येणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतो. पाकविरुद्धची लढत अन्य संघांसोबतच्या लढतीप्रमाणेच असते. कुठल्याही संघासोबत खेळताना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो.’ (वृत्तसंस्था)
गोलंदाजीत पर्याय असणे चांगले : कोहली
- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘परफेक्ट’ गोलंदाजी संयोजनाची निवड करणे ‘चांगली डोकेदुखी’ असल्याचे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
- विराट म्हणाला,‘गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या मनात हा विचार घोळत आहे. सराव सामन्यांत सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित भासत आहे. एका अष्टपैलू खेळाडूव्यतिरिक्त संघात कुणाची निवड करायची हा चांगला प्रश्न आहे. कारण केवळ चारच गोलंदाजांना संधी देता येईल.
- संघाचा समतोल साधण्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत. त्यात दोन फिरकीपटू-दोन वेगवान गोलंदाज, तीन वेगवान गोलंदाज हार्दिक आणि एक फिरकीपटू. खेळपट्टीचे स्वरूप कसे राहील आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध काय योग्य असेल, याचा विचार केल्यानंतरच संघाची निवड करण्यात येईल.’