रहाणेला वगळण्याचा प्रश्नच नाही : अनिल कुंबळे
By admin | Published: March 3, 2017 12:15 AM2017-03-03T00:15:26+5:302017-03-03T00:15:26+5:30
अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर वरचढ ठरण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
बंगळुरू : करुण नायरची एक त्रिशतकी खेळी अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर वरचढ ठरण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मधल्या फळीतील या अनुभवी फलंदाजाला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यात येणार नसल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले.
रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. अखेर त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला केवळ १३ व १८ धावा फटकावता आल्या. भारताला या लढतीत ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रहाणेने गेल्या ५ सामन्यांत २०४ धावा फटकावल्या आहेत.शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कुंबळे म्हणाला, ‘‘रहाणेला वगळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. गेल्या दोन वर्षांत तो कमालीचा यशस्वी ठरला आहे. संघाच्या संयोजनाचा विचार करता, त्याबाबत आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही. सर्व १६ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत. दुर्दैवाने नायरला बाहेर बसावे लागत आहे. नायरने त्रिशतकी खेळी केल्यानंतर त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. पण, आमच्या संघाचे संयोजन त्याच प्रकारचे आहे. आम्ही नेहमी ५ गोलंदाजांसह खेळण्यास उत्सुक असतो. दुर्दैवाने नायर दुखापतग्रस्त खेळाडूच्या स्थानी संघात आला होता. संघांत आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, ही चांगली बाब आहे. करुण चांगला खेळाडू असून त्याने मिळालेल्या संधीचे सोने करून प्रतिभा सिद्ध केली आहे.’’
आगामी कसोटी सामन्यात भारत ५ गोलंदाजांसह खेळेल का, याबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘संघाचे संयोजन योग्य राहील, याची खबरदारी घेण्यात येईल. विजय मिळविण्यासाठी कुठले संयोजन योग्य आहे, याबाबत विचार करण्यात येईल. चार गोलंदाज पुरेसे आहेत की पाच गोलंदाजांची गरज आहे? कुठल्या चार गोलंदाजांना संधी द्यायची? हे सर्व रणनीतीवर अवलंबून आहे. विजय मिळविणे आमचे लक्ष्य आहे.’’
चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास येथील खेळपट्टीबाबत अधिक माहिती नाही. मी येथे खेळून लहानाचा
मोठा झालो; पण येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते.
येथील खेळपट्टी निकाल देणारी राहील, अशी आशा आहे. कसोटी सामन्यासाठी यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे.’’ (वृत्तसंस्था)
कुंबळे यांनी पुढे सांगितले, की ज्या वेळी खेळत होतो, त्या वेळी खेळपट्टी व परिस्थिती यांबाबत कधी विचार केला नाही. त्या वेळी माझी गोलंदाजी व खेळपट्टी याबाबत बरेच लिहिले जात होते; पण एक गोलंदाज, कर्णधार व प्रशिक्षक म्हणून मी खेळपट्टीबाबत कधीच विचार करीत नाही. खेळपट्टी बघण्यासाठी निश्चित जातो; पण रणनीती ठरविण्यासाठी.’’
भारताने डीआरएसचा योग्य वापर केला नाही, याबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘आम्ही याबाबत चर्चा करीत आहोत; पण त्यात आम्ही चूक केल्याचे आम्हाला वाटत नाही. इंग्लंड व बांगलादेशाविरुद्धच्या मालिकांचा विचार केला, तर प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत भारतीय संघाने त्याचा योग्य वापर केला. त्यामुळे याबाबत आत्ताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. आॅस्ट्रेलियाचा संघ चांगला असून आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली, असे वाटत नाही. आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यास उत्सुक असून, लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत.’’
>खेळाडूंना ताळमेळ साधण्यात अपयश आले
खेळाडूंना ताळमेळ साधण्यात अपयश आले. मी भूतकाळाचा विचार करीत नाही, भविष्याबाबत विचार करतो. एक प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे. त्या लढतीत आमच्यासाठी काहीच अनुकूल घडले नाही. मालिकेत अद्याप तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. पुण्यातील खेळपट्टी आव्हानात्मक होती. आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. भारतीय संघाला या खेळपट्टीवर ताळमेळ साधण्यात अपयश आले.