भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचं नाही : पुजारा
By Admin | Published: March 5, 2017 07:29 PM2017-03-05T19:29:22+5:302017-03-05T19:29:22+5:30
सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र असले तरी चेतेश्वर पुजाराने मात्र फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे.
पुणे कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ येथे दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १८९ धावांत गारद झाला. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८ धावांची आघाडी घेतली आहे. तीन डावांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय फलंदाजी खराब असल्याचा ठपका ठेवण्यात येऊ नये, असे पुजारा म्हणाला.
दुस-या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पुजारा म्हणाला,‘आमच्याकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आम्ही नियमित अंतरात विकेट गमावल्या. भारतीय फलंदाजी क्रमामध्ये काहीच चुकीचे नाही. फिरकीपटूंविरुद्ध चांगले खेळतो, अशी आमची ओळख आहे. गेल्या तीन डावांमध्ये आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुस-या डावात आमच्याकडे चांगली रणनीती राहील. आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे.’
पुजारा पुढे म्हणाला,‘आज गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आमच्याकडे अद्याप संधी आहे. वेगवान गोलंदाजांसाठी सोपे काम नव्हते. काही चेंडू खाली राहत होते. त्यांनी अचूक मारा केला. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.
आॅस्ट्रेलियाला आज अधिक धावा फटकावण्याची संधी दिली नाही यात आमचा विजय आहे. आम्ही अचूक मारा करीत सहा बळी घेतले. आम्ही आॅस्ट्रेलियाला ३०० धावांच्या आत रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही आॅस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांना ३०-४० धावांत माघारी परतवण्यात यशस्वी ठरलो तर आम्हाला वर्चस्वाची संधी राहील.’प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर असताना उभय संघातील खेळाडूंकडून शेरेबाजी होत होती, अशी कबुली पुजाराने दिली.
पुजारा म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शेरेबाजी होत असते. नेमके काय म्हटल्या गेले हे मला माहीत नाही. पण, सर्वकाही खिलाडूवृत्तीला साजेसे होते. कुठल्याही खेळाडूवर वैयक्तिक शेरेबाजी झाली नाही.’डीआरएसच्या वापराबाबत बोललताना पुजारा म्हणाला, भारतीय संघासाठी हे नवे आहे. याचा अचूक वापर कसा करायचा, याचा अनुभव भारतीय संघ घेत आहे.