पाकविरुद्ध भारतावर दबाव असेल : व्यंकटपती राजू
By admin | Published: February 5, 2015 01:25 AM2015-02-05T01:25:58+5:302015-02-05T01:25:58+5:30
१५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : विश्वचषकात टीम इंडिया पाककडून कधीही पराभूत झालेला नाही. यंदा मात्र अॅडिलेड येथे १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास अधिकारी असलेला राजू म्हणाला, की पाकच्या तुलनेत भारताची अलीकडील कामगिरी सरस आहे. पण गत चॅम्पियन या नात्याने आणि पाकविरुद्धचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवायचा असल्याने जिंकण्यासाठी भारतावर दबाव असेल. पाककडे गमावण्यासारखे काहीही नाही. १९९२ साली आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात राजू भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला, की विश्वचषकात भारत- पाक सामना पाहणे हा थरार असतो. आमच्यावरही दबाव येतो.
भारताला चॅम्पियन बनायचे झाल्यास पाकला पराभूत करावे लागेल. फिल्डिंगमध्ये आलेल्या मर्यादा आणि पॉवरप्लेबाबतचे नवे नियम यामुळे भारतीय उपखंडातील सेमीफायनल गाठणे कठीण होईल.
१९९२ आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्या वेळी क्षेत्ररक्षणावर मर्यादा नव्हत्या. आता ३० यार्डमध्ये पाच खेळाडू अनिवार्य असतात आणि पॉवरप्लेदेखील असतो. भारताने अंतिम चार संघांत स्थान मिळवावे, अशी इच्छा व्यक्त करीत चारमध्ये भारत येईलच, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजूचे मत आहे. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ असल्याचे तो म्हणाला. न्यूझीलंड, भारत आणि लंका हे अखेरच्या सहा संघांत स्थान मिळवू शकतात, पण भारतीय उपखंडात मेहनत घ्यावी लागेल. भारतीय गोलंदाज आॅस्ट्रेलियात निष्प्रभावी ठरत आहेत. गोलंदाजीतील ही उणीव दूर करण्यासाठी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. जडेजा व अक्षर पटेल नवे असल्याने फलंदाजीवर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. अश्विनकडून काही अपेक्षा असतील, पण पॉवरप्लेमध्ये ईशांतने धावा रोखायला हव्या, असे मत राजूने व्यक्त केले.(वृत्तसंस्था)