आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाविषयी संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:10 AM2018-08-09T04:10:06+5:302018-08-09T04:10:11+5:30
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेची चुरस रंगण्यास दहा दिवसांहून कमी कालावधी राहिला असतानाही भारतीय संघाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेची चुरस रंगण्यास दहा दिवसांहून कमी कालावधी राहिला असतानाही भारतीय संघाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे भारतीय संघ नक्की किती सदस्यांचा असणार याविषयी अजूनही संभ्रम कायम आहेत.
जकार्ता आणि पालेमबैंग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची अंतिम सदस्य संख्या निश्चित करण्याविषयी क्रीडा मंत्रालय अजूनही विचारविनिमय करीत आहे. मात्र स्पर्धा सुरु होण्यास १० दिवसांहून कमी दिवसांचा कालावधी राहिला असतानाही अजून क्रीडा मंत्रालयाच्यावतीने अधिकृत घोषणा झालेली नाही. अनेक बदल आणि काटछाट केल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक संघटनाने (आयओए) ५७५ खेळाडू आणि २१३ अधिकाºयांची यादी सोमवारी क्रीडा मंत्रालयाकडे सोपविली. याविषयी आता क्रीडा मंत्रालयाला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्राने माहिती दिली की, ‘भारतीय सदस्यांच्या अंतिम यादीसाठी एक किंवा दोन दिवसांचा अवधी लागू शकतो.’ आयओएने १० आॅगस्टला आशियाई स्पर्धेसाठी जाणाºया भारतीय संघासाठी निरोप समारंभ आयोजित केला आहे. तोपर्यंत क्रीडा मंत्रालय अधिकृत यादी जाहीर करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.