जर्सीवर दोन्ही आर्इंचे नाव लिहिण्याची इच्छा होती
By admin | Published: October 31, 2016 06:30 AM2016-10-31T06:30:26+5:302016-10-31T06:30:26+5:30
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आपल्या जर्सीवर आपल्या आईचे नाव लिहून क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले.
विशाखपट्टणम : न्यूझीलंडविरुद्ध नुकताच झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आपल्या जर्सीवर आपल्या आईचे नाव लिहून क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. मात्र, या वेळी या सामन्यातून पदार्पण केलेल्या स्पिनर जयंत यादवपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्याला जर्सीवर आपल्या दोन्ही आर्इंचे नाव लिहिण्याची इच्छा होती.
जयंतला जन्म देणाऱ्या आईचे नाव लक्ष्मी असून त्यांचे १७ वर्षांपूर्वी एका विमान अपघातामध्ये निधन झाले. या सामन्यात जयंतच्या जर्सीवर लक्ष्मी यांचेच नाव होते. मात्र, ज्यांनी जयंतचे पालनपोषण केले त्या ज्योती यादव यांचेही नाव आपल्या जर्सीवर लिहिण्याची जयंतची इच्छा होती. ज्योती यांनी जयंतला प्रत्येक वेळी मोलाचा पाठिंबा दिला आहे. यामुळेच जयंतला आपल्या जर्सीवर आपल्या दोन्ही आर्इंचे नाव लिहिण्याची इच्छा होती.
जयंतने या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली, की ‘माझ्या दोन्ही आर्इंचे नाव जर्सीवर लिहिण्याची माझी इच्छा होती, परंतु असे होऊ शकले नाही. मी माझी आई ज्योती यांना सांगू इच्छितो, की भलेही माझ्या जर्सीवर तुमचे नाव लिहिले गेले नसले तरी, तुम्ही माझ्या मनात सदैव आहेत.’’(वृत्तसंस्था)