सिंधूकडून आणखी चांगली कामगिरी होईल
By admin | Published: December 22, 2016 12:23 AM2016-12-22T00:23:59+5:302016-12-22T00:23:59+5:30
सिंधूसाठी यंदाचे वर्ष अप्रतिम राहिले. नुकताच झालेला दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्समध्ये ती प्रत्येक सामन्यात चांगली खेळली.
मुंबई : ‘सिंधूसाठी यंदाचे वर्ष अप्रतिम राहिले. नुकताच झालेला दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्समध्ये ती प्रत्येक सामन्यात चांगली खेळली. विशेष म्हणजे तिने ज्याप्रकारे या स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला ते लक्षवेधी होते. तिच्याकडून भविष्यात आणखी चांगली कामगिरी होईल,’ अशा शब्दांत राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचे कौतुक केले.
बुधवारी मुंबई प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या मुंबई रॉकेट्स संघाच्या जर्सीचे अनावरण झाले. यावेळी गोपीचंद बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘सिंधू भलेही उपांत्य सामन्यात सुंग जी ह्यूनविरुद्ध पराभूत झाली असेल. परंतु, त्या सामन्यात सुंगचा खेळ खरंच अप्रतिम होता. तो शानदार सामना होता. एकूणच सिंधूसाठी वर्ल्ड सुपरसीरिज लढत खूप चमकदार ठरली.’
सिंधूकडून याहूनही अधिक शानदार कामगिरी करण्याची क्षमता असल्याची सांगताना गोपीचंद म्हणाले की, ‘मी नेहमीच सिंधूविषयी सांगत आलो आहे. जेव्हा तिने सलग दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकले, तेव्हाही मी याहून चमकदार कामगिरी करेल असे मी सांगितले होते. मी आताही हेच सांगेन की, तिची अजून सर्वश्रेष्ठ कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल.’
त्याचप्रमाणे ‘आज ज्या स्तरावर सिंधू आली आहे, त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. अनेक नावाजलेले खेळाडू तिच्याविरुद्ध खेळण्याआधी दोन वेळा विचार करतात. दबावात तिने चमकदार कामगिरी केली आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असेही गोपीचंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)