कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या खेळाडूंचे विलगीकरण होणार - किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:14 AM2020-03-20T05:14:28+5:302020-03-20T05:14:34+5:30
जे सर्वांसाठी सक्तीचे नियम आहेत, तेच खेळाडूंसाठीही आहे. त्यांनाही वेगळे रहावे लागेल
नवी दिल्ली : ‘कोरोना विषाणूने प्रभावित देशातून परतणाऱ्या खेळाडूंना नक्कीच वेगळे रहावे लागेल,’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सांगितले. त्याचवेळी आयपीएल व आॅलिम्पिक आयोजनाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन फ्रान्स व जर्मनी हे देश कोरोनाग्रस्त आहेत.
रिजिजू म्हणाले, ‘जे सर्वांसाठी सक्तीचे नियम आहेत, तेच खेळाडूंसाठीही आहे. त्यांनाही वेगळे रहावे लागेल. जे खेळाडू कोरोनाग्रस्त देशांतून परतत आहेत, त्यांना सरकारच्या नियमानुसार वेगळे रहावे लागेल. त्यात कोणालाही सूट नसेल.’
भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला प्रवासाबाबतच्या निर्बंधांमुळे भारतात परतण्यास उशीर होत आहे. त्याने जर्मनीत स्वत:ला वेगळे ठेवले आहे. विनेश फोगाट व भालाफेकपटू नीरज चोप्रा हे युरोपातून परतणार आहेत.
भारतीय मुष्टियोध्यांबाबत त्यांनी सांगितले की, ‘त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आणि आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने घेतलेल्या चाचणीत ते कोरोनाबाबत पॉझिटिव्ह नाही. त्यांना धोका नाही.’