Controversies Of CWG 2022: या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:30 PM2022-08-10T12:30:21+5:302022-08-10T12:34:56+5:30
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते.
बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. तब्बल ७२ देशातील खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावर जमल्याने स्पर्धेने अवघ्या जगाला आकर्षित केले होते. मात्र या स्पर्धेतील काही वादांमुळे स्पर्धेला एक वाईट डाग देखील लागला आहे. यातील काही वादांमध्ये भारतीय संघांचा देखील समावेश होता. भारतीय हॉकी महिलांना तर या वादामुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कोरोना संक्रमित असतानाही मैदानात
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यात एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोना संक्रमित असताना देखील मैदानात उतरला होता. कोरोना संक्रमित असलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी नसताना देखील ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळला. बर्गिंहॅम २०२२ च्या आयोजन समितीने, आयसीसीने, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट मंडळांनी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर तालिया मॅक्ग्राला कोरोना पॉझीटिव्ह असताना देखील भारताविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात खेळू दिले. त्यामुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.
महिला हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. या पराभवामुळेच भारतीय महिला सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाल्या होत्या.
लवलीनाचे प्रशिक्षक ओळखण्यावरून वाद
बर्गिंहॅम गावात मर्यादीत संख्येने खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना आतमध्ये येण्यास परवानगी दिली होती. लवलीना बोरगोहेनचे प्रशिक्षक संध्या गुरूंग यांना यावेळी वेगळी ओळख देण्यात आली, त्यामुळे त्यांना गावामध्ये प्रवेश करू दिला नाही. लवलीनाने मानसिक छळ केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला. अखेर बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्कर भट्ट यांना त्याच्या प्रशिक्षकाला मान्यता द्यावी लागली.
ॲथलीट्स गाव नसल्याने खेळाडू नाराज
बर्गिंहॅम २०२२ च्या आयोजकांकडे सर्व खेळाडूंना सामावून घेण्यासाठी एकही ॲथलीट्स गाव नव्हते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या खेळांच्या आधारे एकूण पाच लहान गावात ठेवण्यात आले. तसेच काही खेळाडूंना हे सोयीचे देखील होते कारण त्यांना गावापासून मैदानापर्यंत जाण्यासाठी जास्त प्रवास करावा लागत नव्हता. खेळाडूंसाठी मोठ्या गावाचे वातावरण पदके जिंकूनही चांगले नव्हते, जे काही खेळाडूंसोबत झालेल्या घटनांमुळे दिसून आले.