ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 10:03 AM2024-09-01T10:03:37+5:302024-09-01T10:04:21+5:30

Paris Olympics 2024: समस्त पुणेकरांनी शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करत पुणेकरांनी त्यांच्या कामगिरीला सलाम केला.

They came.. they saw and conquered everything...! Pune residents salute the Indian athletes in the Paris Olympics | ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम

- उमेश गो. जाधव

पुणे - ढोलताशांचा गजर, शालेय विद्यार्थ्यांची लगबग, ओसंडून वाहणारा उत्साह आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक पाहताच सुरू झालेला जल्लोष अशा चैतन्यमयी वातावरणात समस्त पुणेकरांनी शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करत पुणेकरांनी त्यांच्या कामगिरीला सलाम केला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने आयोजित 'जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात पॅरिस ऑलिम्पिकमध्येमहाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या पदक विजेत्या आणि जगज्जेत्या खेळाडूंना पुणेकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. पॅरिसमध्ये कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे, तिरंदाज प्रवीण जाधव, उंच उडीपटू सर्वेश कुशारे यांच्यासह जगज्जेती तिरंदाज अदिती स्वामी, जगज्जेता तिरंदाज ओजस देवतळे, मल्लखांबपटू शुभंकर खवले यांचा सत्कार पाहण्यासाठी पुणेकरांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे गर्दी केली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक पुनीत बालन, प्रताप जाधव, सनी निम्हण, संदीप चव्हाण उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिक आणि याआधी ऑलिम्पिकमध्ये वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, माजी खो-खोपटू श्रीरंग इनामदार, बाळकृष्ण अकोटकर, नौकानयनपटू स्मिता यादव, बॉक्सिंगपटू गोपाळ देवांग यांचाही सन्मान करण्यात आला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक पदक जिंकतो हे पाहण्याची संधी स्वप्नीलने दिली, अशी भावना पाहुण्यांनी व्यक्त केली.

स्वप्नीलने पदक दाखवताच जल्लोष
स्वप्नील कुसाळेने विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक पदक दाखवताच सभागृहात जल्लोष सुरू झाला. टाळ्या, शिट्यांच्या कडकडाटात सर्वांनी स्वप्नीलला उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी स्वप्नील म्हणाला की, योग्य आहार, व्यायाम आणि खेळ जवळ केला तर तुम्हीही देशासाठी शानदार कामगिरी करू शकाल. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.

तिरंदाज प्रवीण जाधव म्हणाला की, घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अॅथलेटिक्समध्ये संधी दिली. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीत मी तिरंदाजीकडे वळलो. प्रबोधिनीत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घडलो. २०१७ पर्यंत मी पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तीन पदके जिंकली. आता सैन्यातून मिळालेल्या मदतीमुळे खेळत आहे.

सर्वेशने चाऱ्याची बनवली गादी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वेश कुशारे याचे उंच उडीमध्ये अवघ्या सात सेंटिमीटरने पदक हुकले होते. कुशारे म्हणाला की, दहावीत असतानाच मी बालेवाडीत राज्यस्तरीय स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यानंतर पुढील सरावासाठी मी आणि वडिलांनी मक्याचा चारा, जुने कपडे यांचा वापर करून गादी तयार केली. त्यानंतर काही वर्षे मी यावरच सराव केला.

Web Title: They came.. they saw and conquered everything...! Pune residents salute the Indian athletes in the Paris Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.