भारताचा सलग तिसरा पराभव
By Admin | Published: September 9, 2015 02:23 AM2015-09-09T02:23:29+5:302015-09-09T02:23:29+5:30
भारतीय फुटबॉल संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीच्या लढतीत आशियातील बलाढ्य इराण संघाकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला.
बंगळुरू : भारतीय फुटबॉल संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीच्या लढतीत आशियातील बलाढ्य इराण संघाकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला.
कांतिवीरा स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात फिफा मानांकनात ४०व्या क्रमांकावर असलेल्या इराण संघाने १५५ वे मानांकन असलेल्या भारतीय संघाविरुद्ध सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखले. इराणचा आघाडी फळीचा अव्वल खेळाडू सरदार अजमूनने (ज्याला मेस्सी संबोधले जाते) २९ व्या मिनिटाला संघाचे
खाते उघडले. त्यानंतर भारतीय
संघाने इराण संघाच्या खेळाडूंनी केलेले प्रत्येक आक्रमण परतावून लावले.
भारताच्या आघाडी फळीतील खेळाडूंनीसुद्धा चांगल्या चाली रचल्या; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. भारताचा कर्णधार सुनील छेत्रीला इराणच्या गोलपासून काही अंतरावर चेंडू ताब्यात मिळाला. त्याने तो जोरात गोलच्या दिशेने मारला. पण चेंडू गोल पोस्टच्या जवळून गेल्यामुळे त्याची संधी हुकली. मध्यंतरापर्यंत इराणकडे १-० गोलची आघाडी होती.
विश्रांतीनंतर भारताच्या जैकीचंदला सिंहने चेंडूवर ताबा मिळवून इराणच्या गोलच्या दिशेने गेला. त्याने चेंडू क्रॉस मारला, तेथे जेजेने चेंडूला हेड मारून इराणच्या गोलमध्ये टाकला. पण त्यांच्या गोलरक्षकाने चपळाईने चेंडू अडविला. इराणच्या खेळाडूंनी भारतीय बचाव फळी खिळखिळी केली. त्यांच्या आंद्रानिक तेमोरियनने ४७ व्या, तर मेहदी तारेमीने ५१ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाचा विजय साजरा केला.
भारतीय संघ अजूनपर्यंत
गुणांचे आपले खाते उघडू शकला नाही. ८ आॅक्टोबर रोजी त्यांचा
पुढील सामना तुर्कमेनिस्तानविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)