तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

By Admin | Published: August 30, 2015 10:52 PM2015-08-30T22:52:06+5:302015-08-30T22:52:06+5:30

ईशांत शर्माच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पण यजमान संघाच्या

Third day bowlers dominate | तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व

googlenewsNext

कोलंबो : ईशांत शर्माच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पण यजमान संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भारताची ३ बाद २१ अशी अवस्था करीत श्रीलंका संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबवावा लागला; त्यावेळी रोहित शर्मा (१४) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ०१) खेळपट्टीवर होते. भारताकडे एकूण १३२ धावांची आघाडी असून ७ विकेट शिल्लक आहे. निर्णायक कसोटी सामन्यातील चौथा दिवस रंगतदार ठरण्याचे संकेत मिळत आहे. सोमवारी उभय संघ सामन्यावर पकड मजबूत करण्याच्या निर्धाराने उतरतील. सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदानावर तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ६५.१ षटकांत केवळ २४२ धावा फटकावल्या गेल्या आणि १५ फलंदाज बाद झाले.
भारताने पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १४५) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३१२ धावांची मजल मारली. त्यानंतर ईशांत शर्माच्या (५४ धावांत ५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळत १११ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. स्टुअर्ट बिन्नी व अमित मिश्रा यांनी अनुक्रमे २४ व २५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेत ईशांतला योग्य साथ दिली. उमेश यादवने १ बळी घेतला.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डावातील दुसऱ्याच चेंडूवर पुजारा बाद झाला. त्याला धम्मिका प्रसादने क्लिनबोल्ड केले. पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करताना पुजारा अखेर नाबाद होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील ४५ तर भारताचा चौथा फलंदाज ठरला. नुवान प्रदीपने लोकेश राहुलचा (०२) त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर षटकात प्रदीपने अजिंक्य रहाणे (४) याला माघारी परतवत भारताची ३ बाद ७ अशी अवस्था केली.
त्यानंतर कोहली व रोहित यांनी डाव सावरला. पण त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला.
त्याआधी, कालच्या ८ बाद २९२ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव ३१२ धावांत आटोपला. भारताला आज केवळ २० धावांची भर घालता आली. रंगाना हेराथने (३-८४), ईशांत शर्मा (६) आणि उमेश यादव (४) यांना त्रिफळाचित करीत भारताचा पहिला डाव गुंडाळला. पुजारा अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने २८९ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार ठोकले. श्रीलंका संघातर्फे धम्मिका प्रसादने १०० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर ईशांतच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. श्रीलंका संघाची एकवेळ ६ बाद ४७ अशी नाजुक अवस्था झाली होती. पण पदार्पणाची कसोटी खेळणारा कुशाल परेरा (५५) आणि हेराथ (४९) यांनी सातव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करीत यजमान संघाचा डाव सावरला. सलामीवीर उपुल थरंगा पहिल्याच षटकात सुदैवी ठरला. ईशांतच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात लोकेश राहुलला टिपता आला नाही. त्यावेळी थरंगाने खातेही उघडले नव्हते. ईशांतने त्यानंतर पाचव्या षटकात थरंगाला (४) बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. उमेश यादवने कौशल सिल्वाला (३) तंबूचा मार्ग दाखवला. दिनेश चांदीमल (२३) याला स्टुअर्ट बिन्नीने बाद केले. ईशांतने १७ व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला (०१) तंबूचा मार्ग दाखवला, तर बिन्नीने त्यानंतरच्या षटकात दिमुथ करुणारत्ने (११) याला बाद केले. लाहिरू थिरिमाने (०) खाते उघडण्यात अपयशी ठरला. परेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला.

धावफलक
भारत पहिला डाव : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, चेतेश्वर पुजारा नाबाद १४५, अजिंक्य रहाणे पायचित हो. प्रदीप ०८, विराट कोहली झे. परेरा गो. मॅथ्यूज १८, रोहित शर्मा झे. थरंगा गो. प्रसाद २६, स्टुअर्ट बिन्नी पायचित गो. प्रसाद ००, नमन ओझा झे. थरंगा गो. कौशल २१, रविचंद्रन अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ०५, अमित मिश्रा यष्टिचित परेरा गो. हेराथ ५९, ईशांत शर्मा त्रि. गो. हेराथ ०६, उमेश यादव त्रि. गो. हेराथ ०४. अवांतर (१८). एकूण १००.१ षटकांत सर्वबाद ३१२. बाद क्रम : १-२, २-१४, ३-६४, ४-११९, ५-११९, ६-१७३, ७-१८०, ८-२८४, ९-२९८, १०-३१२. गोलंदाजी : प्रसाद २६-४-१००-४, प्रदीप २२-६-५२-१, मॅथ्यूज १३-६-२४-१, हेराथ २७.१-३-८४-३, कौशल १२-२-४५-१.

श्रीलंका पहिला डाव : उपुल थरंगा झे. राहुल गो. ईशांत ०४, कौशल सिल्वा त्रि. गो. यादव ०३, दिमुथ करुणारत्ने झे. राहुल गो. बिन्नी ११, दिनेश चांदीमल पायचित गो. बिन्नी २३, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. ओझा गो. ईशांत ०१, लाहिरू थिरिमाने झे. राहुल गो. ईशांत ००, कुशाल परेरा झे. कोहली गो. ईशांत ५५, धम्मिका प्रसाद यष्टिचित ओझा गो. मिश्रा २७, रंगाना हेराथ झे. ओझा गो. ईशांत ४९, थारिंडू कौशल पायचित गो. मिश्रा १६, नुवान प्रदीप नाबाद ०२. अवांतर (१०). एकूण ५२.२ षटकांत सर्वबाद २०१. बाद क्रम : १-११, २-११, ३-४०, ४-४५, ५-४७, ६-४७, ७-१२७, ८-१५६, ९-१८३, १०-२०१. गोलंदाजी : ईशांत १५-२-५४-५, यादव १३-२-६४-१, बिन्नी ९-३-२४-२, अश्विन ८-१-३३-०, मिश्रा ७.२-१-२५-२.

भारत दुसरा डाव : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ००, के.एल. राहुल त्रि. गो. प्रदीप ०२, अजिंक्य रहाणे पायचित गो. प्रदीप ०४, विराट कोहली खेळत आहे ०१, रोहित शर्मा खेळत आहे १४. अवांतर (००). एकूण ८.१ षटकांत ३ बाद २१. बाद क्रम : १-०, २-२, ३-७. गोलंदाजी : प्रसाद ४.१-२-८-१, प्रदीप ३-१-६-२, हेराथ १-०-७-०.

(वृत्तसंस्था)

Web Title: Third day bowlers dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.