पावसामुळे रखडला तिसऱ्या दिवसाचा खेळ
By admin | Published: August 12, 2016 03:57 AM2016-08-12T03:57:01+5:302016-08-12T03:57:01+5:30
दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही.
ग्रास इसलेट : दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही. भारतीयांना पहिल्या डावात ३५३ धावांत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर यजमानांनी मजबूत सुरुवात करत ४७ षटकात १ बाद १०७ धावांची मजल मारली होती.
सेंट ल्यूसियामध्ये ढगाळ वातावरण कायम असून हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल. शिवाय मैदानातील काही भागामध्ये पाणी साचले असल्याने मैदान सुकविण्याचे मोठे आव्हान ग्राऊंड्समनपुढे असेल. तत्पूर्वी, आघाडीची फळी स्वस्तात ढेपाळल्यानंतर भारताची ५ बाद १२६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साह (१०७) यांनी दमदार शतक झळकावताना सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक द्विशतकी भागीदारी करुन भारताला समाधानकार मजल मारुन दिली.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात करताना अर्धशतकी सलामी दिली. दिवसभर भारताला यश मिळणार नाही याची पुरेपुर काळजी क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन यांनी घेतली होती. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जॉन्सनला धावबाद करताना लोकेश राहुलने भारताला पहिले यश मिळवून दिले. जॉन्सनन ७५ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. त्याने ब्रेथवेटसह शानदार ५९ धावांची भागीदारी केली. यानंतर दिवसअखेर ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो यांनी टिकून राहताना नाबाद ४८ धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजांना रोखले. ब्रेथवेटने १४३ चेंडूत ६ चौकरांसह नाबाद ५३ धावा काढल्या असून त्याला उपयुक्त साथ देणारा ब्रावो ६६ चेंडूत १८ धावांवर नाबाद आहे.