तिसरी कसोटी आजपासून : भारताचे आॅस्ट्रेलियावर वर्चस्व राहण्याची शक्यता
By admin | Published: March 16, 2017 01:28 AM2017-03-16T01:28:14+5:302017-03-16T01:28:14+5:30
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे.
रांची : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे. रांचीतदेखील गुरुवारपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीपूर्वी उभय संघांच्या आकर्षणाचे केंद्र खेळपट्टीच आहे.
बंगळुरू येथे दुसऱ्या कसोटीदरम्यान उद्भवलेल्या डीआरएस वादाचा सौहार्दपूर्ण शेवट झाला. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेत १-१ने बरोबरीत असलेले उभय संघ रांचीच्या जेसीए स्टेडियममधील खेळपट्टीवर नजरा रोखून आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना असेल.
पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब, तर बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीची खेळपट्टीदेखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता. बंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. दुसऱ्या कसोटीत प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ पायचित झाल्याने रिव्ह्यू मागण्याआधी त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहिले. यावर बराच वाद गाजला. तिसऱ्या सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते; पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले.
आठवडाभराआधी येथे पाऊस पडला. आज सकाळी खेळपट्टीवर पाणी टाकण्यात आले. त्यामुळे खेळपट्टीवर टणकपणा नसेल. या मालिकेत आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाने शतक ठोकलेले नाही. तीन अर्धशतके ठोकणारा लोकेश राहुल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटने ४ डावांत केवळ ४० धावा केल्या. बंगळुरूत पुजारा-रहाणे यांनी पाचव्या गड्यासाठी ११८ धावा करून सामना खेचून आणला होता. मालिकेतील ही एकमेव शतकी भागीदारी आहे.
खांदेदुखीतून सावरलेला सलामीचा मुरली विजय तिसऱ्या सामन्यात अभिनव मुकुंदचे स्थान घेईल. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क फ्रॅक्चर होऊन बाहेर पडताच आॅस्ट्रेलियाला जबर धक्का बसला. त्याची जागा पॅट कमिन्सने घेतली. २०११मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध पदार्पणात ७ बळी घेणाऱ्या कमिन्सने त्यानंतर मात्र कसोटी सामना खेळलेला नाही. त्याला उद्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिशेल मार्श हादेखील मायदेशी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. अबुधाबी येथे नोव्हेंबर २०१४मध्ये खेळलेला मॅक्सवेल त्यानंतर एकही कसोटी खेळला नाही. आॅफ स्पिनर नाथन लियोनच्या बोटाला दुखापत असली तरी तो खेळेल, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.
सामन्याची वेळ :
सकाळी ९.३०
स्थळ : जेएससीए
आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची
मालिकेवर लक्ष केंद्रित करणार : कोहली
बंगळुरूत जे झाले, ते विसरून आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने कटुता ठेवता येणार नाही. आमचे क्रिकेटला प्राधान्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मला काय म्हटले, त्याबद्दल खेद नाही. आता पुढे पाहायचेय. मी जे बोलतो, त्याबद्दलच विचार करतो. सामन्यादरम्यान बराच ब्रेक मिळाल्याने एकाच मुद्द्यावर वेळ घालविण्यापेक्षा पुढचा विचार कधीही चांगलाच. आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर वादावर दोन्ही बोर्डांनी चांगली भूमिका घेतल्याचा आनंद आहे. मला टार्गेट करण्यात आले, त्यावर काहीच बोलायचे नाही. टीकेचे लक्ष्य होण्याचे टाळून कुणीही १५-१६ वर्षे क्रिकेट खेळू शकत नाही. ही मालिका मात्र वैयक्तिक स्पर्धा करण्याची नाहीच. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून डावपेच आखतो.
कोहलीचा दावा तथ्यहीन : स्मिथ
कोहलीने माझ्यावर केलेला आरोप तथ्यहीन आहे. मी खेळ संपल्यानंतर सांगितले, की मी चुकलो आणि माझ्याकडून झालेली ही मोठी चूक होती. आम्ही ड्रेसिंग रूमकडे पाहतो. आमच्यासाठी ही नवी बाब नाही. कोहलीच्या आरोपात तथ्य नाही. कोहली माझ्याबाबत चुकीचे बोलत होता.
आम्ही तिसऱ्या सामन्यादरम्यान एकमेकांपुढे येणार आहोत. त्या वेळी मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांच्या उपस्थितीत मी कोहलीकडे विचारणा करू शकतो. सामन्यासाठी नाथन लियॉन पूर्णपणे फिट आहे. मिशेल स्टार्क मायदेशी परतला, तरी आमच्याकडे २० बळी घेणारे गोलंदाज आहेत. विकेट पाहू आणि नाणेफेकीचा कौल आल्यानंतर अंतिम एकादशची निवड करणार आहोत.
कमिन्स हा चांगला पर्याय असला, तरी वेगवान गोलंदाज की फिरकीपटू, हा पर्याय सामन्याआधीच ठरविण्यात येईल.
आॅस्टे्रलियन संघाने घेतली ‘युवा’ संस्थेची भेट
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रांची येथे आलेल्या आॅस्टे्रलियाच्या क्रिकेट संघाने मुलींसाठी कार्य करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला भेट देऊन तेथील मुलींना आश्चर्याचा धक्का दिला. सांघिक खेळ खेळण्यासाठी मुलींना प्रोत्साहन व संधी देणाऱ्या ‘युवा’ संस्थेला भेट देऊन कांगारू संघाने मुलींना प्रोत्साहन दिले.
आॅस्टे्रलियन संघाने तिसऱ्या कसोटीच्या सराव सत्रातून काहीवेळ काढत झारखंडच्या काही प्रेरणादायी महिला खेळाडूंची भेट घेतली. हे सर्व खेळाडू ‘युवा’च्या माध्यमातून शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण घेत असून आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आॅस्टे्रलियन खेळाडूंनी या मुलींशी गप्पागोष्टी करताना त्यांचे अनुभव ऐकले.
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.
आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, जॅक्सन बर्ड, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, नाथन लियोन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह ओकिफी, मॅट रेनशॉ, मार्कस स्टोयनिस, मिशेल स्वीपसन आणि मॅथ्यू वेड.