‘त्या’ ६७ खेळाडूंची ‘रिओ’वारी हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 03:26 AM2016-07-12T03:26:00+5:302016-07-12T03:26:00+5:30
आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी होण्याबाबत रशियाच्या खेळाडूंनी केलेली याचिका आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने
मॉस्को : आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी होण्याबाबत रशियाच्या खेळाडूंनी केलेली याचिका आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) फेटाळून लावली. सातत्याने होणाऱ्या डोपिंगच्या आरोपांमुळे रशियाच्या
ट्रॅक अॅण्ड फील्ड अॅथलिटवर आयएएएफने बंदी घातली होती. यामुळे आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. विशेष म्हणजे, रशियाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेने (एआरएएफ) याबाबत एका निवेदनाद्वारे स्पष्टही केले.
एआरएएफने सांगितले, की आयएएएफने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पाठविलेल्या एकूण ६८ रशियन अॅथलिटच्या याचिकांपैकी ६७ फेटाळून लावल्या आहेत. केवळ लांब उडी प्रकारात सहभागी होणारी डारिया क्लिशिना हिची एकटीचीच याचिका आयएएएफने स्वीकारली आहे.
रशियन संघटनेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले, की ‘आम्ही रिओ आॅलिम्पिकसाठी ६७ अॅथलिटना मान्यता दिली होती. कारण, या सर्व खेळाडूंनी एआरएएफ बोर्डाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि ते आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकत होते. मात्र,
आता त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.’ (वृत्तसंस्था)