मनीष कौशिकसह तीन भारतीय उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:28 AM2019-02-26T06:28:19+5:302019-02-26T06:28:22+5:30
माकरान चषक बॉक्सिंग : नेगी व टोकस यांचीही आगेकूच
नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिकसह (६० किलो) तीन भारतीय बॉक्सर्सनी इराणच्या छाबाहारमध्ये सुरू असलेल्या माकरान कप बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले.
राष्ट्रीय चॅम्पियन मनीषने रविवारी रात्री उपांत्यपूर्व फेरीत सलार मोमिवांडचा ५-० ने पराभव केला. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये माजी राष्ट्रीय चॅम्पियन दुर्योधनसिंग नेगी (६९ किलो) आणि रोहित टोकस (६४ किलो) यांचा समावेश आहे.
पदकाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय बॉक्सर्सची संख्या आता ८ पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक), मंजीत सिंग (७५ किलो), संजीत (९१ किलो), ललित प्रसाद (५२ किलो) आणि दीपक (४९ किलो) यांनी शनिवारी उपांत्य फेरी गाठली होती. नेगीने रविवारी सर्वांत दमदार विजय मिळवला. (वृत्तसंस्था)
एकतर्फी लढतीत मनीष पराभूत
मनीष पवारसाठी (८१ किलो) निराशाजनक दिवस ठरला. त्याला उपांत्यपूर्व फेरीत केवियान सफारीविरुद्ध ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मनीषला प्रयुत्तर देण्याची संधीच मिळाली नाही. राष्ट्रीय पदकविजेत्या रोहितने तुर्कमेनिस्तानच्या तुग्रुईबागचा ५-० ने पराभव केला.