ब्राझीलचे तीनतेरा
By admin | Published: July 14, 2014 05:19 AM2014-07-14T05:19:39+5:302014-07-14T05:19:39+5:30
ब्राझीलला चार दिवसांच्या अंतरात दुसऱ्यांदा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. प्ले आॅफ लढतीत नेदरलँडने यजमान ब्राझीलचा ३-० ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत तिसरे स्थान पटकाविले.
ब्रासिलिया : ब्राझीलला चार दिवसांच्या अंतरात दुसऱ्यांदा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. प्ले आॅफ लढतीत नेदरलँडने यजमान ब्राझीलचा ३-० ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत तिसरे स्थान पटकाविले. या निराशाजनक निकालानंतर ब्राझीलची पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानावर दाखल झालेल्या चाहत्यांनी हुटिंग केले.
उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध ७-१ ने पराभव स्वीकारणाऱ्या ब्राझील संघाला प्ले आॅफ लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. नेदरलँडतर्फे कर्णधार रॉबिन वान पर्सी (तिसरा मिनिट), डेली ब्लाइंड (१७ वा मिनिट) आणि जॉर्जिनियो विनालडम (९०+१ मिनिट) यांनी प्रत्येकी एक
गोल नोंदवित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा एकदा स्टेडियममध्ये दाखल झालेले ब्राझीलचे हजारो चाहते या निकालामुळे निराश झाले.
जर्मनी व अर्जेंटिना संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीच्या पूर्वसंध्येला खेळल्या गेलेल्या या लढतीत वान पर्सीने नेदरलँडला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. निलंबनाच्या कारवाईमुळे उपांत्य फेरीच्या लढतीला मुकलेला ब्राझीलचा कर्णधार थियागो सिल्वाने आर्येन रोबेनला नियमबाह्य पद्धतीने रोखल्यामुळे नेदरलँडला पंचांनी पेनल्टी बहाल केली. मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वान पर्सीने ब्राझीलचा गोलकिपर ज्युलियो सेसारला गुंगारा देत गोल नोंदविला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत पर्सीचा सहा सामन्यांतील हा चौथा गोल ठरला. दुसऱ्या गोलसाठी ब्राझीलचा डिफेंडर डेव्हिड लुईस कारणीभूत ठरला. लईस विश्वविक्रमी पाच कोटी पाऊंड किमतीला पॅरिस सेंट जर्मेन एफसीसोबत करारबद्ध होणार आहे, हे विशेष.
लुईसने हेडरद्वारे चेंडू क्लिअर करण्याऐवजी ब्लाइंडकडे सोपविला. त्याने कुठलीच चूक न करता चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्लाइंडचा हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला. विनालडमने त्यानंतर इंज्युरी टाईममध्ये चेंडूला गोलजाळ्यात पोहोचवित संघाचा विजय निश्चित केला. या लढतीत मैदानावर ब्राझीलतर्फे आॅस्करची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने चांगली चाल रचली, पण हॉलंडचा गोलकिपर जास्पर किलेसेनने त्याचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
ब्राझीलसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. संघाला या स्पर्धेत १४ गोल स्वीकारावे लागले. पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या चॅम्पियन्स संघाविरुद्ध हे सर्वाधिक गोल आहेत.
दरम्यान, ब्राझीलने काही चांगल्या चाली रचल्या, पण त्यांना गोल नोंदविता आला नाही. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला जो व रमिरेज यांना गोल करण्याची संधी होती, पण त्यात त्यांना यश आले नाही. यजमान संघाने मध्यंतरापूर्वी चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण राखले आणि चांगल्या चाली रचल्या, पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. मध्यंतरानंतर लुइस गुस्ताव्होच्या स्थानी फर्नांडिन्होला पाचारण करण्यात आले, तर रमिरेजच्या जागी हल्कला संधी देण्यात आली, पण ब्राझील संघाला गोल नोंदविण्यात यश मिळाले नाही.
दरम्यान, ब्राझील संघ ५० व्या मिनिटाला नशिबवान ठरला. नेदरलँडने एक चांगली चाल रचली, पण त्यांना गोल करता आला नाही. ब्राझीलने अखेरच्या काही मिनिटांमध्ये चांगल्या चाली रचताना पराभवातील
अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे फिनिशिंग निराशाजनक होते.
त्याआधी, प्रशिक्षक लुइस फिलिप स्कोलारी यांनी जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत १-७ ने पराभव स्वीकारणाऱ्या संघात चार बदल केले. सिल्वाचे पुनरागमन निश्चित होते, पण प्रशिक्षकांनी तीन नवे मिडफिल्डर विलियन, रमिरेज व पालिन्हो यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. मार्सेलो, डांटे, फर्नांडिन्हो, हल्क, बर्नाड व फ्रेड यांना सुरुवातीला संधी देण्यात आली नाही. नेदरलँड संघाला सामना प्रारंभ होण्यापूर्वीच धक्का बसला. वार्म अप करताना वेस्ले स्नायडर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. (वृत्तसंस्था)