ऐतिहासिक विजयाच्या उंबरठयावर
By admin | Published: September 25, 2016 08:25 PM2016-09-25T20:25:44+5:302016-09-26T00:06:44+5:30
न्यूझीलंड संघाची आघाडीची फळी गारद करीत पहिल्या कसोटी सामन्यात मोठया विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 25 - आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर भारताने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाहुण्या न्यूझीलंड संघाची आघाडीची फळी गारद करीत पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
भारताने दुसरा डाव ५ बाद ३७७ धावसंख्येवर घोषित करीत न्यूझीलंडपुढे विजयासाठी ४३४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची रविवारी, चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ९३ अशी अवस्था झाली होती. न्यूझीलंडला विजयासाठी ३४१ धावांची तर भारताला ६ बळींची गरज आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी ल्युक रोंची (३८) आणि मिशेल सँटनर (८) खेळपट्टीवर होते. न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी अश्विनची गोलंदाजी खेळणे आव्हान ठरले. अश्विनने दुसऱ्या डावात आतापर्यंत ६८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कारकिर्दीतील २०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. आॅस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटनंतर (३६ सामने) सर्वांत कमी लढतींमध्ये असा पराक्रम करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.
भारताने कालच्या १ बाद १५९ धावसंख्येवरुन पुढे खेळताना दुसरा डाव ५ बाद ३७७ धावसंख्येवर घोषित केला. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा (७८), मुरली विजय (७६), रोहित शर्मा (नाबाद ६८ धावा, ८ चौकार) व रवींद्र जडेजा (नाबाद ५० धावा, २ चौकार, ३ षटकार) यांनी अर्धशतके झळकावली. विजय व पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावा जोडल्या तर रोहित व जडेजा यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर सहाव्या विकेटसाठी १०० धावांची अभेद्य भागीदारी केली. कोहली (१८) मात्र पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. धावफलकावर केवळ ३ धावांची नोंद असताना त्याचे दोन्ही सलामीवीर मार्टिन गुप्तील (०) व टॉम लॅथम (२) तंबूत परतले होते. या दोघांना अश्विनने बाद केले. त्यानंतर अश्विनने किवी कर्णधार केन विलियम्सन (२५) आणि रॉस टेलर (१७) यांच्यादरम्यानची भागीदारी संपुष्टात आणत भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. अश्विनने विलियम्सनला पायचित करीत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर टेलर विचित्रपणे धावबाद झाला. उमेश यादवचा थ्रो यष्टिवर आदळला त्यावेळी क्रिजपर्यंत पोहोचलेल्या टेलरची बॅट मात्र हवेत होती.
रोंचीने भारतीय फलंदाजांपासून धडा घेत आक्रमक फलंदाजी केली. त्याने आतापर्यंत ५८ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार ठोकला. सँटनरने संयमी फलंदाजी करीत त्याला योग्य साथ दिली. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत पहिला डाव ३१८. न्यूझीलंड पहिला डाव २६२.
भारत दुसरा डाव :- लोकेश राहुल झे. टेलर गो. सोढी ३८, मुरली विजय पायचित गो. सँटनर ७६, चेतेश्वर पुजारा झे. टेलर गो. सोढी ७८, विराट कोहली झे. सोढी गो. क्रेग १८, अजिंक्य रहाणे झे. टेलर गो. सँटनर ४०, रोहित शर्मा नाबाद ६८, रवींद्र जडेजा नाबाद ५०. अवांतर (९). एकूण १०७.२ षटकांत ५ बाद ३७७ (डाव घोषित). बाद क्रम : १-५२, २-१८५, ३-२१४, ४-२२८, ५-२७७. गोलंदाजी : बोल्ट ९-०-३४-०, सँटनर ३२.२-११-७९-२, क्रेग २३-३-८०-१, वॅगनर १६-५-५२-०, सोढी २०-२-९९-२, गुप्तील ४-०-१७-०, विलियम्सन ३-०-७-०.
न्यूझीलंड दुसरा डाव :- टॉम लॅथम पायचित गो. अश्विन ०२, मार्टिन गुप्तील झे. विजय गो. अश्विन ००, केन विलियम्सन पायचित गो. अश्विन २५, रॉस टेलर धावबाद १७, ल्युक रोंची खेळत आहे ३८, मिशेल सँटनर खेळत आहे ०८. अवांतर (०३). एकूण ३७ षटकांत ४ बाद ९३. बाद क्रम : १-२, २-३, ३-४३, ४-५६. गोलंदाजी : शमी ४-०-६-०, अश्विन १६-१-६८-३, जडेजा १४-१०-८-०, यादव ३-०-९-०.