थायलंडचा रोमांचक विजय
By Admin | Published: October 20, 2016 06:35 AM2016-10-20T06:35:54+5:302016-10-20T06:35:54+5:30
उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेल्या सामन्यात थायलंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘ब’ गटात जपानचे कडवे आव्हान ३७-३३ असे परतावले.
अहमदाबाद : उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेल्या सामन्यात थायलंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘ब’ गटात जपानचे कडवे आव्हान ३७-३३ असे परतावले. या शानदार विजयासह थायलंडने बलाढ्य इराणला पिछाडीवर टाकताना गटविजेतेपद पटकावले. आता, उपांत्य फेरीत थायलंडपुढे यजमान भारताचे तगडे आव्हान असेल. तर, दुसरीकडे इराण विरुध्द कोरिया असा रंगतदार सामना रंगेल.
जपान व कोरियासाठी उपांत्य फेरी गाठण्यास विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडिस तोड खेळ करताना सामन्याची रंगत अखेरपर्यंत कायम राखली. परंतु, शेवटच्या दोन मिनिटांमध्ये थायलंडने आक्रमक खेळ करताना मोक्याच्यावेळी गुणांची कमाई करुन ३३-३२ अशा आघाडीवरुन ३७-३३ असे भक्कम वर्चस्व मिळवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. कर्णधार खोमसान थाँगखम याने शेवटच्या दोन मिनिटात निर्णायक चढाई करताना जपानला दबावाखाली आणले.
मध्यंतराला १७-१७ अशी बरोबरी राहिलेल्या या सामन्यात खोमसानने सर्वाधिक १० गुण मिळवताना शानदार चढाया केल्या. संती बनचोएत यानेही ५ गुणांची कमाई करताना खोमसानला चांगली साथ दिली. जपानकडून हुकमी खेळाडू कझुहिरो तकानोने शानदार अष्टपैलू खेळ केला. परंतु, त्याची झुंज अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)
>बांगलादेशचा विजयी निरोप
केवळ औपचारिकता राहिलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत ‘अ’ गटाच्या अखेरच्या लढतीत बांगलादेशने अर्जेंटिनाचा ६७-२६ असा फडशा पाडून विजयी निरोप घेतला. बांगलादेशने या स्पर्धेत ३ विजय २ पराभव अशी कामगिरी करताना १६ गुणांची कमाई केली. तर, अर्जेटिनाला एकाही सामन्यात बाजी मारण्यात यश आले नाही. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या या लढतीत बांगलादेशने अपेक्षित वर्चस्व मिळवताना अर्जेंटिनाला दबावाखाली ठेवले. बांगलादेशच्या आक्रमक धडाक्यापुढे अर्जेंटिनाला अखेरपर्यंत सूर गवसला नाही. मध्यंतरलाच बांगलादेशने ३३-१५ अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्या आव्हानातली हवा काढली.