पुण्यात रंगणार ‘भारत श्री’चा थरार; ६००हून अधिक खेळाडू सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:02 AM2018-02-16T06:02:57+5:302018-02-16T06:03:17+5:30
पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून, यंदा तब्बल ५० लाखांहून अधिक रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर होईल.
मुंबई : पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून, यंदा तब्बल ५० लाखांहून अधिक रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर होईल.
भारतीय शरीरसौष्ठव महासंघ (आयबीबीएफ)च्या वतीने होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष असेल. त्याच वेळी या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून, खेळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खेळाडू व संघटनेच्या अधिका-यांच्या राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सांघिक जेतेपदासाठी महाराष्ट्र सज्ज...
स्पर्धेच्या सांघिक जेतेपदाचे लक्ष्य बाळगलेल्या महाराष्ट्राची मदार सुनीत जाधव, महेंद्र चव्हाण, सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे यांच्यावर अवलंबून असेल. त्याच वेळी, बलाढ्य रेल्वेचे तगडे आव्हान महाराष्ट्रापुढे असेल. रेल्वेच्या जावेद अली खान, राम निवास, किरण पाटील, सागर जाधव, भास्करन आणि प्रीतम चौगुले यांच्यापुढे महाराष्ट्राच्या शरीररसौष्ठवपटूंना कठोर परिश्रम घ्यावे लागतील.
पुणेकरांना पर्वणी...
स्पर्धेत सुमारे ४००हून अधिक पुरुष, तर महिला गटात किमान २५ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग अपेक्षित असल्याचे आयोजकांनी म्हटले. याशिवाय फिजिक स्पोटर््स या विशेष गटासाठी मोठ्या संख्येने पुरुष व महिला गटात मॉडेल सहभागी होणार असल्याने पुणेकरांना थरार अनुभवण्याची मोठी पर्वणी लाभली आहे.
24-25 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे येथे रंगणा-या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेतून राज्य संघाची निवड होईल. सलग पाचव्यांदा किताब पटकावण्याची संधी मुंबईकर सुनीतकडे असून, सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असेल.
यंदाच्या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांचा विजेता मुंबईकर सुनीत जाधव याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. कामगिरीतील सातत्य कायम राखत चमकदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा त्याचा निर्धार आहे. त्याच वेळी, त्याच्यापुढे सागर कातुर्डे, मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण, नितीन म्हात्रे यांच्याकडून कडवी लढत मिळेल. शिवाय उत्तर प्रदेश, सेनादल आणि रेल्वेसारख्या तगड्या संघातील खेळाडूंचेही मुख्य आव्हान सुनीतपुढे राहील.