वज्रमूठ पडद्याआड
By admin | Published: June 5, 2016 04:12 AM2016-06-05T04:12:33+5:302016-06-05T04:12:33+5:30
भारतीयांना महान मुष्टियोद्ध्यांना पाहण्याची संधी १९८० मध्ये मिळाली होती. तेव्हा त्यांच्या प्रदर्शनीय लढतीचे वर्णन ‘ग्रेटेस्ट टू ग्रेटेस्ट’ असे करण्यात आले होते.
नवी दिल्ली : भारतीयांना महान मुष्टियोद्ध्यांना पाहण्याची संधी १९८० मध्ये मिळाली होती. तेव्हा त्यांच्या प्रदर्शनीय लढतीचे वर्णन ‘ग्रेटेस्ट टू ग्रेटेस्ट’ असे करण्यात आले होते.
अली यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नईत प्रदर्शनीय लढती खेळल्या होत्या. तेव्हा ते लंडनस्थित एनआयआय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांच्या निमंत्रणामुळे येथे आले होते. लॉर्ड पॉल यांनी श्रद्धांजली देताना म्हटले, की तो खऱ्या अर्थाने महान होता. भारतात त्याला पाहून प्रेक्षक रोमांचित झाले होते. त्यातही सर्वसामान्य प्रेक्षकांपेक्षा खेळाडू अली याच्याशी संवाद साधल्यानंतर जास्त रोमांचित झाले होते. त्यातील एक तमिळनाडूचा रेंडोल्फ पीटर्स होता. त्याला अली यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली होती. तो म्हणाला, की मी त्या वेळी रेल्वेचा फेदरवेट चॅम्पियन होतो. २५ वर्षांचा होतो आणि त्या वेळी मी त्यांच्याशी हस्तांदोलन केले होते, याचे आजही मला स्मरण आहे. तेव्हा मी त्यांच्याशी लढण्याची विनंती केली, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि ‘तू इतका छोटा असून माझ्याबरोबर खेळू इच्छितो. मी एकाच हुकमध्ये तुला स्टेडियमच्या बाहेर फेकून देईन,’ असे म्हणाले. मी
स्मित केले आणि प्रदर्शनीय लढतीनंतर त्यांनी काही स्थानिक मुष्ट्यिोद्ध्यांना बोलावले व माझी इच्छादेखील पूर्ण केली.
अल्पपरिचय
१७ जानेवारी १९४२ रोजी अमेरिकेतील लुईसविले, कैंटकी येथे जन्मलेले कॅसियस मार्सेलस हे पुढे जाउन जगभरात मोहम्मद अली या नावाने ओळखले जावू लागले. तीन वेळा विश्व चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या अली यांनी १९६0 साली रोम आॅलिम्पिकचे सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी कारकिर्दीत ६१ लढती खेळल्या, त्यापैकी ५६ लढती जिंकल्या. विशेष म्हणजे त्यातील ३७ लडती नॉकआउट होत्या.
बॉक्सर म्हणून यशस्वी ठरलेल्या अली यांचे कौटुंबिक जीवन मात्र तितकेसे यशस्वी झाले नाही. त्यांनी एकूण चार लग्ने केली. १७ आॅगस्ट १९६७ साली बेलिडा बोएड हिच्याशी पहिले लग्न केले. लग्नानंतर बेलिडा खलिला बनली. तिला एकूण चार अपत्ये झाली. जमिला आणि रशिदा या जुळ्या मुलीनंतर १९७२ साली त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मोहम्मद अली ज्युनिअर असे ठेवण्यात आले. चौथ्या क्रमांकाची मुलगी मरियम ही विख्यात लेखिका आहे.
मोहमद अली यांची ऐतिहासिक लढत १ आॅक्टोबर १९७५ साली फिलिपिन्समध्ये झाली होती. या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता जगभर होती. संपर्काच्य सुविधा नसणाऱ्या त्या काळात वाचकांना या लढतीचा आॅँखो देखा हाल केवळ ‘लोकमत’ने दिला. ‘लोकमत’चे विद्यमान एडीटर- इन- चिफ राजेंद्र दर्डा यांचे मित्र शिवलिंगम अगोडोराई त्यावेळी हॉँगकॉँगमधील एका वृत्तपत्रात होते. दर्डा यांनी शिवलिंग यांना ट्रंककॉल लावला आणि ‘लोकमत’साठी ही लढत कव्हर करण्यास सांगितले. यासाठी शिवलिंगम तब्बल १०२८ किलोमीटरचा प्रवास करून फिलीपिन्समध्ये पोहोचले आणि या लढतीची ताजी बातमी ‘लोकमत’च्या वाचकांना देऊन एक सुखद अनुभूती दिली.
मोहंमद अली यांच्या आत्म्याला शांती लाभो, अली एक आदर्श खेळाडू आणि प्रेरणास्रोत होते. त्यांनी ऊर्जा आणि दृढतेला प्रमाणित केले होते. अली यांचे शनिवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दशकांपासून ते पार्किसन्स व्याधीने त्रस्त होते.
- नरेंद्र मोदी
अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी महान मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांना श्रद्धांजली वाहिली. अली महान होते. आणि असे चॅम्पियन होते जे नेहमी सत्यासाठी लढले असेही ओबामा यांनी म्हटले.
- बराक व मिशेल ओबामा
मोहंमद अली यांच्यासारखा दुसरा होणे नाही. फूलपाखरासारखे बागडणे आणि प्रतिस्पर्ध्याला मधमाशीप्रमाणे डंख मारून घायाळ करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
खासदार विजय दर्डा,
चेअरमन, लोकमत एडिटोरीअल बोर्ड
अली एक महान मुष्टियोद्धे होते. त्यांनी मला आणि अनेक खेळाडूंना या खेळात येण्यासाठी प्रोत्साहित केले. साधारण परिवारातून आलेले अली ज्या उंचीवर पोहोचले त्यानेच त्यांना महान बनवले. बॉक्सिंगचे हे मोठे नुकसान आहे.
- एम.सी. मेरी कोम, बॉक्सर्स
मोहंमद अली, तुम्ही नेहमी एक लिजेंड राहाल, लिजेंड कधीही मरत नाही. आम्ही तुम्हाला कायम स्मरणात ठेवू. त्यांनी बॉक्सिंगसाठी जे काही केले त्याला कधीच विसरले जाऊ शकत नाही. रिंगबाहेरील कार्यानेही ते
महान बनले.
- विजेंदरसिंग