उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा राज्य पुरस्कार प्राप्त भानुप्रिया यांच्यावर मास्क विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:37 AM2020-09-04T03:37:59+5:302020-09-04T03:46:53+5:30
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करणारी जिद्दी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे.
मुंबई : दोन्ही पाय अधू असणारी हरहुन्नरी गायिका, कॅरम, पॉवर लिफ्टिंग, जलतरण क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करणारी जिद्दी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे.
वडाळा येथे भानुप्रिया वास्तव्यास आहेत. जन्मानंतर सहा महिन्यांनी त्यांना पोलिओ झाला. दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त असलेल्या भानुप्रिया यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आपल्या या छोट्याशा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टेलरिंगचे काम करणाऱ्या भानुप्रिया यांच्या व्यवसायावर कोरोनामुळे गदा आली. अशा वेळी ताराई फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिला. आता त्या मास्क बनवून तेथे विकतात. जिद्दीच्या बळावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीचा त्यांचा संघर्ष सुरूख् आहे.
दिव्यांगांच्या जलतरण क्रीडा प्रकारात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा आवाज सुरेल आहे. त्या आॅर्केस्ट्रामध्ये गातात. मात्र सध्या सर्वच कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे आता पोटापाण्यासाठी मास्क विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रत्येक मास्कमागे दहा रुपये मिळतात. मात्र एवढ्याने भागत नाही. त्यामुळे स्वत:सह मुलांच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावत आहे.
सरकारने पुढाकार घ्यावा
कोरोना संकटकाळात आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग खचले आहेत. रेशनची मदत पुरेशी नाही. दिव्यांगांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे भानुप्रिया यांचे म्हणणे आहे.