‘गोल्डन बॉय’वर मजुरी करण्याची वेळ !
By Admin | Published: February 11, 2016 03:24 AM2016-02-11T03:24:36+5:302016-02-11T03:24:36+5:30
एकेकावर काय वेळ येते पाहा, नियतीचा खेळच विचित्र. शांघाय स्पेशल आॅलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावलेला अपंग अॅथलिट पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतोय.
लखनौ : एकेकावर काय वेळ येते पाहा, नियतीचा खेळच विचित्र. शांघाय स्पेशल आॅलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावलेला अपंग अॅथलिट पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करतोय. हामिद नावाच्या या ‘विशेष’ खेळाडूची ही व्यथा.
लखनौच्या अलिगंज येथे राहणाऱ्या ३० वर्षीय हामिदने आक्टोबर २००७ मध्ये शांघाय (चीन) येथील ‘स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. निश्चित हा क्षण देशवासियांसाठी अभिमानास्पद होता. मात्र, या ‘सुवर्ण’ यशाानंतरही हामिदच्या जीवनात मात्र सोनेरी दिवस आलेच नाहीत.
हामिदची आई हदीकुन्निसा हिने वृत्तसंस्थेला सांगितले की, मानसिकदृष्ट्या विकलांग; पण बहुमुखी प्रतिभेचा धनी असलेल्या तिच्या मुलाने जेव्हा शांघाय येथील स्पर्धेत शर्यत, उंच उडी आणि गोळाफेकमध्ये विजयाचे झेंडे रोवले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांना निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित केले होते. तेव्हा हामिदला नोकरी आणि रोख पुरस्कार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते हवेतच विरले. हदीकुन्निसा म्हणाल्या, हामिदचे वडील काही वर्षांपूर्वीच मरण पावले. वृद्धापकाळामुळे त्यांना आता संसाराचा गाडा ओढता येत नाही. त्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी हामिदला मजुरी करावी लागत आहे.
हामिदसोबत शांघाय येथे गेलेले त्याचे प्रशिक्षक एजाज यांनी सांगितले की, स्पेशल आॅलिम्पिकच्या पाच स्पर्धांत सहभागी होणारा तो भारताचा एकमवे खेळाडू आहे.प्रतिभासंपन्न तसेच खूप समजदार आहे. केवळ त्याला आसऱ्याची गरज आहे. त्याला स्थानिक नोकरी मिळाली तर त्याचे जीवन सार्थ होईल.
मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या ‘चेतना’ या संस्थेत त्याची आई हामिदला घेऊन आली होती. येथेच त्याच्यातील खेळकौशल्य विकसित झाले आहे.