टिंटू लुका रियो आॅलिम्पिकसाठी पात्र

By admin | Published: August 27, 2015 04:02 AM2015-08-27T04:02:36+5:302015-08-27T04:02:36+5:30

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाचे आव्हान पहिल्या हिट

Tintu Luka Rio qualifies for the Olympics | टिंटू लुका रियो आॅलिम्पिकसाठी पात्र

टिंटू लुका रियो आॅलिम्पिकसाठी पात्र

Next

बीजिंग : जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत
भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाचे आव्हान पहिल्या हिट पात्रताफेरीतच संपुष्टात आले. उपांत्यफेरीसाठी आपली जागा निश्चित न करू शकलेल्या लुकाने यंदाच्या सत्रातील आपली सर्वश्रेष्ठ वेळेची नोंद करताना आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले.
८०० मीटरच्या पहिल्या फेरीतील हिटमध्ये लुकाने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २ मिनिटे ००.९५ सेकंदांची वेळ देत शर्यत पूर्ण केली. मात्र, तिला या वेळी सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रत्येक हिटमधील अव्वल तीन क्रमांकाच्या धावपटू आणि सर्वश्रेष्ठ वेळ नोंदवणारे पुढील सहा धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. लुकाने २०१०मध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना १ मिनिटे ५९.१७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. रियो आॅलिम्पिकसाठी आवश्यक असलेली २ मिनिटे ०१:०० सेकंदाची वेळ लुकाने पार करून आॅलिम्पिक तिकीट मिळवले आहे.
विशेष म्हणजे या शर्यतीच्या पहिल्या लॅपमध्ये लुका ५७.०६ सेकंदासह आठ धावपटूंमध्ये पहिल्या स्थानी होती. मात्र यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तसेच अखेरच्या २०० मीटरमध्ये ती खूप मागे पडली. यापूर्वी लुकाने २०११ साली दक्षिण कोरियातील दाएगू येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. दरम्यान, या फेरीमध्ये युरोपीय चॅम्पियन बेलारूसच्या मरिना अरजामासोवाने बाजी मारली. तर ग्रेट ब्रिटनच्या लिंसे शार्प आणि २००९ ची विजेती दक्षिण आफ्रिकेच्या कास्टर सेमेन्या यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)

२०० मीटरमध्ये जंगी मुकाबला..
या स्पर्धेत सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीच्या अंतिम शर्यतीकडे. जमैकाचा सुपरफास्ट उसेन बोल्ट आणि त्याला नेहमीच कडवी झुंज देणारा अमेरिकेचा जस्टीन गॅटलिन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्याने क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
याआधी झालेल्या १०० मीटर शर्यतीमध्ये काही शतांशच्या फरकाने बोल्टने बाजी मारत गॅटलिनला नमवले होते. त्यामुळे आता तीच थरारक शर्यत पुन्हा एकदा २०० मीटरमध्ये पाहण्यास मिळेल.
उपांत्य फेरीतील शर्यतीमध्ये गॅटलिनने बोल्टपेक्षा चांगली वेळ देत १९.८७ सेकंदाच्या वेळेसह अंतिम फेरी गाठली. तर बोल्टने अंतिम फेरीत प्रवेश करताना १९.९५ सेकंदाची वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत कायमच वरचढ ठरणारा बोल्ट काय करु शकतो याची कल्पना असल्याने गॅटलिन त्याच्या विरुध्द गाफिल राहण्याची चूक कदापी करणार नाही.

झुंजार मोहंमद फराहने गाठली अंतिम फेरी
ब्रिटनचा विक्रमवीर धावपटू मोहंमद फराह याने बुधवारी ५,००० मीटर शर्यतीत अडखळल्यानंतर अंतिम
फेरीत प्रवेश केला. ट्रॅकवळ पडल्यानंतरही फराहने हार न मानता झुंजार कामगिरी केली.
१० हजार मीटर शर्यतीत बाजी मारल्यानंतर ५ हजार मीटर शर्यतीचे विजेतेपद पटकावण्याचा निर्धार केलेल्या फराहने चांगली सुरुवात केली. मात्र, अखेरच्या लॅपमध्ये फराह अडखळला आणि त्याचा वेग कमी झाला. परंतु तरीदेखील त्याने स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. या वेळी इथिओपियाचा १८ वर्षीय ज्युनियर चॅम्पियन योमिफ केजल्वाने १३ मिनिटे १९.३८ सेकंदांची वेळ देऊन बाजी मारली. तर, अखेरच्या फेरीमध्ये अडखळल्यानंतरही फराहने द्वितीय स्थान पटकावले.
गत दोन जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत ५,००० मीटर शर्यतीत बाजी मारल्यानंतर फराहला विक्रमी हॅट्ट्रिक कामगिरी खुणावत आहे. जर का यामध्ये फराह यशस्वी ठरला, तर जागतिक स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणार तो पहिला धावपटू ठरेल.

Web Title: Tintu Luka Rio qualifies for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.