आज भारत-वेस्टइंडिजमध्ये पहिली वनडे, कोहलीसमोर विराट चॅलेंज
By admin | Published: June 23, 2017 12:58 AM2017-06-23T00:58:08+5:302017-06-23T07:51:02+5:30
कर्णधार विराट कोहली आजपासून (शुक्रवार) विंडीजविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिके...
पोर्ट आॅफ स्पेन : कर्णधार विराट कोहली आजपासून (शुक्रवार) विंडीजविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वादग्रस्त परिस्थितीत दिलेल्या राजीनाम्याचा वाद विसरण्यास इच्छुक राहील. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रवास कॅरेबियन द्वीपसमूहापासून प्रारंभ झाला होता, पण वर्षभराचा कालावधी उलटण्यापूर्वी भारतीय संघ येथे प्रशिक्षकाविना पुन्हा दौऱ्यावर आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा कर्णधार कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यादरम्यानचा वाद चर्चेत राहिला.
अफगाणिस्तानविरुद्ध संघर्ष करणाऱ्या कमकुवत विंडीज संघाविरुद्ध भारतीय संघ वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि विंडीज संघांदरम्यान शुक्रवारी वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत खेळल्या जाणार आहे.पाच वन-डे सामन्यांची मालिका आणि एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर चाहत्यांचे कोहली-कुंबळे वादावरून लक्ष हटविण्यास मदत मिळेल. त्याचसोबत कोहलीला आपल्या मर्जीप्रमाणे संघाची निवड करण्याची संधी राहील. कारण फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची यामध्ये कुठली भूमिका राहणार नाही.
जेसन होल्डच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. यजमान संघाच्या तुलनेत भारतीय संघाचा दर्जा वरचा आहे. कोहलीला याची चांगली कल्पना आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कुंबळे प्रकरणात समर्थन मिळाल्यानंतर भारतीय कर्णधाराला आता चूक करण्याची विशेष संधी राहणार नाही. भारतीय संघ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ५-० ने बाजी मारण्याची शक्यता आहे. कारण विंडीजच्या १३ खेळाडूंना एकूण २१३ सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यात होल्डर (५८ सामने) सर्वांधिक अनुभव असलेला खेळाडू आहे.
याउलट युवराज सिंग (३०१), महेंद्रसिंग धोनी (२९१) आणि कोहली (१८४) यांनी एकूण ७७६ सामने खेळले आहेत. यावरून उभय संघांदरम्यान अनुभवामध्ये किती तफावत असल्याचे दिसून येते. त्यासोबत टीम इंडियाला या मालिकेच्या निमित्ताने बेंच स्ट्रेंथ तपासण्याची संधी मिळणार आहे. जसप्रीत बुमराह याला मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधाराला मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चाचणी घेण्याची पूर्ण संधी मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शमीला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
हा वेगवान गोलंदाज २०१५ च्या विश्वकप सेमीफायनलनंतर एकही अधिकृत वन-डे आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. विश्वकप स्पर्धेनंतर शमीला अनेक शस्त्रक्रियेंना सामोरे जावे लागले. त्यानतंर तो केवळ काही कसोटी सामने खेळला. रोहित शर्माला मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत कोहली अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा आघाडीला संधी देऊ
शकतो. रहाणेला अलीकडच्या कालावधीमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करता आलेली नाही, पण राखीव सलामीवीर म्हणून त्याला संधी मिळू शकते.
आणखी एक पर्याय युवा रिषभ पंतला संधी मिळू शकते. त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीतर्फे डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे. पंत आक्रमक खेळाडू असून पहिल्या पॉवर प्लेचा लाभ घेऊ शकतो. पहिल्या पॉवर प्लेमध्ये केवळ दोन क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर असतात. त्याचसोबत निवड समिती त्याच्याकडे धोनीचा वारसदार म्हणून बघत आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.
वेस्ट इंडिज संघाला अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानची गोलंदाजी खेळताना अडचण भासली होती. अशा स्थितीत युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी मिळू शकते. कुलदीपला रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या स्थानी संधी
मिळू शकते. या दोघांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विशेष छाप सोडता आली नाही.
भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि उमेश यादव.
वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कॉर्टर, मिगुलएल कमिंस, अल्जारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरन पॉवेल, केसरिक विलियम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, शाई होप, एविन लुईस, अॅश्ले नर्स व रोवमॅन पॉवेल.
सामना (भारतीय वेळेनुसार) :- सायंकाळी ६ वाजल्यापासून.