न्यूझीलंडविरुद्ध आज भारताचा पहिला पेपर

By admin | Published: March 15, 2016 03:34 AM2016-03-15T03:34:21+5:302016-03-15T03:34:21+5:30

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाला अलीकडच्या यशस्वी कामगिरीच्या बळावर टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध आज मंगळवारी सलामी

Today India's first paper against New Zealand | न्यूझीलंडविरुद्ध आज भारताचा पहिला पेपर

न्यूझीलंडविरुद्ध आज भारताचा पहिला पेपर

Next

- किशोर बागडे,  नागपूर
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाला अलीकडच्या यशस्वी कामगिरीच्या बळावर टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध आज मंगळवारी सलामी लढत जिंकून विजयी वाटचाल करण्याचे आव्हान असेल. या सामन्यासाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
आशिया चषक चॅम्पियन, जबर फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर पहिला अडथळा कसा पार करतो, यावर भारताची स्पर्धेतील पुढील वाटचाल अवलंबून असेल. अपेक्षांच्या दडपणात असलेला भारतीय संघ टी-२०त अव्वल स्थानावर आहेच; शिवाय आशिया चषक जिंकून विश्वचॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि युवराजसिंग यांच्या उपस्थितीत संघाची फलंदाजी भक्कम असून गोलंदाजीत आशीष नेहरा, युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन आश्विन हे वेगवान आणि फिरकीपटू आहेत.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात २००७ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यास सज्ज असलेला भारतीय संघ संतुलित दिसतो. खेळाडू फॉर्ममध्ये आहेत, शिवाय कामगिरीत सातत्य राखून आहेत. आशिया चषकात अजिंक्य राहून जेतेपद पटकाविल्याने संघाकडून अपेक्षा आणखी वाढल्या.
भारताने विंडीजविरुद्ध पहिला सराव सामना ४५ धावांनी जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेकडून अवघ्या चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव चुकांपासून बोध घेण्यास पुरेसा असावा. आकड्यांवर नजर टाकल्यास भारताला धावांचा पाठलाग करणे नेहमीच कठीण गेले असे दिसते. विराट, रोहित आणि धवन हे फॉर्ममध्ये असल्याने मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करू शकतात. सुरुवातीला पडझड झाली तरी झुंजार विराट डाव सावरू शकतो. त्याने यंदा चार अर्धशतके ठोकली. पण विश्वचषकासारख्या स्पर्धेत केवळ एका खेळाडूवर विसंबून राहणे महागडे ठरू शकते. मधल्या फळीत सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, कर्णधार धोनी आणि स्टार आॅल राऊंडर युवराजसिंग हे धावा खेचण्यात पटाईत आहेत. धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर, तर युवी मॅचविनर मानला जातो. अखेरच्या सराव सामन्यात युवीने आठ चेंडूंत १६ धावा केल्या, पण तो विजयावर शिक्कामोर्तब करू शकला नव्हता. मधली फळी दडपणात धावा काढू शकत नाही, हीदेखील धोनीची मुख्य चिंता आहे.
आफ्रिकेविरुद्ध धवनने ७३ आणि विंडीजविरुद्ध रोहितने ९८ धावा केल्या. हे पाहता आघाडीच्या फलंदाजांवर बरेच काही विसंबून राहील. हे फलंदाज लवकर बाद झाले तर डाव कोसळण्याची भीती आहे. २००९, २०१० आणि २०१२ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीदेखील गाठू न शकण्यामागील कारणही फलंदाजीतील अपयश हेच राहिले. २०१४ मध्ये लंकेने भारताला अंतिम लढतीत नमविले होते. धोनी, युवराज, रैना, विराट, रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार हे मागच्या विश्वचषकातही संघात होते. या सर्वांचा अनुभव यंदा उपयुक्त ठरेल.
३६ वर्षांचा आशीष नेहरा संघात येईल, असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. पुनरागमनानंतर त्याने दहा सामन्यांत १३ गडी बाद केले. मोहम्मद शमी यानेही फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्यापासून दोन्ही सराव सामन्यात यशस्वी कामगिरी बजावली. पण कामगिरीत सातत्य राखणाऱ्या बुमराहला वगळणे कठीण असल्याने शमी ११ जणांत स्थान मिळवेल, याबद्दल शंका आहे. हार्दिक पंड्या नवा गेम चेंजर बनला आहे. धोनीचा तो सर्वाधिक पसंत खेळाडू आहे. सराव सामन्यात त्याने पाच बळी घेतले. फिरकीचा आधारस्तंभ आश्विन तर ट्रम्प कार्ड मानला जातो.
न्यूझीलंडने लंकेवर पहिल्या सराव सामन्यात ७४ धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडकडून दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. कर्णधार केन विल्यम्सन, मार्टिन गुप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस
टेलर, कॉलिन मुन्रो, कोरी
अ‍ॅन्डरसन आणि ग्रांट इलियट हे
प्रभावी फलंदाज संघात आहेत. इश सोधी, अ‍ॅन्डरसन आणि वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने हे भारताला कोंडीत पकडू शकतात.

प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करू : कोहली
आॅस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आशिया चषकात विजय संपादन करणारा भारतीय संघ विश्करंडकातही विजयी मालिका कायम ठेवण्याच्या निर्धाराने खेळेल, असे तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितले. विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करू, असेही विराटने स्पष्ट केले.
लागोपाठ तीन मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास दुणावला असून, कामगिरीतही सुधारणा झाली. विश्वचषकात सहभागी झालेला प्रत्येक संघ जेतेपदाचा दावेदार असून, त्यांना पराभूत करणे आव्हानात्मक असेल. गाफिल राहून चालणार नाही. साधी चूकही स्पर्धेबाहेर करू शकते. प्रत्येक सामना गांभीर्याने घेत लक्ष केंद्रित करून व अतिरिक्त दडपण न घेता खेळणार आहे.

आव्हान पेलण्यास सज्ज : केन विल्यम्सन
न्यूझीलंड क्रिकेट संघाने आतापर्यंत कुठलीही आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकली नाही, याची जाणीव खेळाडूंनाही आहे. त्यामुळे या वेळी आम्ही ही परंपरा मोडीत काढून विजयासाठीच मैदानात उतरणार आहोत. भारतीय संघ तगडा आहे, पण त्यांचे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने स्पष्ट केले. विलियम्सन म्हणाला, स्पर्धेची तयारी पुरेशी झाली असून, सराव सामन्यांद्वारे भारतातील वातावरणाशी एकरूप होण्यास मदत झाली.

उभय संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, हरभजन सिंग, पवन नेगी आणि मोहम्मद शमी.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, हेन्री निकोल्स, ल्यूक रोंची, रॉस टेलर, कॉलीन मुन्रो, मिशेल सेंटनेर,
नाथन मॅक्युलम, ग्रांट इलियट, मिशेल मॅक्लिनागन, टीम साउदी,
ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिल्ने, ईश सोधी, कोरी अ‍ॅन्डरसन.

हेड टू हेड
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४ सामने झाले असून हे चारही सामने न्युझीलंडने जिंकले आहेत.
भारताने आत्तापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४२ विजय संपादन केले असून २५ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
न्युझीलंड संघाने आत्तापर्यंत
८८ सामने खेळले आहेत. ४४ सामन्यांत त्यांनी विजय नोंदविला असून ४२ मध्ये पराभव पत्कारला आहे. २ सामन्यांचा निकाल लागू
शकला नाही.

सामन्याची वेळ
सायंकाळी ७.३० पासून
स्थळ :
व्हीसीए स्टेडियम, जामठा

Web Title: Today India's first paper against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.