कोहलीची आज अग्निपरीक्षा

By admin | Published: June 11, 2017 12:50 AM2017-06-11T00:50:54+5:302017-06-11T00:50:54+5:30

गत चॅम्पियन भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा उपांत्यपूर्व सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल.

Today's fire test of Kohli | कोहलीची आज अग्निपरीक्षा

कोहलीची आज अग्निपरीक्षा

Next

लंडन : गत चॅम्पियन भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा उपांत्यपूर्व सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान असेल. विराट कोहलीच्या वन डे नेतृत्वाचा या सामन्यात कस लागणार आहे.
लंकेकडून पराभव होताच भारतीय तंबूत निराशा पसरली. अशावेळी दडपणात गुडघे टेकणाऱ्या द. आफ्रिकेला कोंडीत पकडून पराभूत करण्याचे डावपेच कोहलीला आखावे लागणार आहेत. भारत पराभूत झाल्यास स्पर्धेबाहेर पडेल. द. आफ्रिका हरल्यास जगातील नंबर वन संघ उपांत्य सामन्यापासून वंचित राहील.
मैदानाबाहेर वादविवाद सुरू असताना मैदानावर आज कोहलीसाठी एकही चूक महागडी ठरू शकेल. दुसरीकडे कसोटीपासून दूर असलेल्या एबी डिव्हिलियर्सला वन डेत अद्याप दमदार कामगिरी कायम असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.द. आफ्रिकेकडे क्वींटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर असे तीन डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघात अश्विनला स्थान मिळण्याची दट शक्यता असेल.
रवींद्र जडेजा मागच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे त्याचे स्थान अश्विन घेऊ शकतो. अश्विन दोन सामने बाहेर राहिल्यानंतर कामगिरी करण्यास उत्सुक असेल. जडेजा ३० यार्डच्या आत तरबेज क्षेत्ररक्षक तर आहेच शिवाय सीमारेषेवरून अलगद थ्रो देखील करतो. प्रत्येक सामन्यात तो किमान १०-१५ धावा वाचवितो. हार्दिक पांड्याला देखील बाहेर केले जाणार नाही. सातव्या स्थानावर आक्रमक खेळणारा त्याच्यासारखा फलंदाज नाही. जसप्रीत बुमराह डेथ डोव्हरमध्ये चांगले यॉर्कर टाकतो. याचा अर्थ असा की अश्विनला उमेश यादव किंवा भुवनेश्वरऐवजी स्थान द्यावे लागेल. लंकेविरुद्ध दुसऱ्या पॉवरप्लेदरम्यान भारताने २०० वर धावा मोजल्या. त्यामुळे देखील धावगतीला लगाम लावण्यासाठी अश्विनला खेळविणे क्रमप्राप्त झाले आहे. भारताच्या आघाडीच्या फळीने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा, शिखर धवन ही जोडी फॉर्ममध्ये आहे. (वृत्तसंस्था)

विराटचा लाल चेंडूने सराव
द.आफ्रिकेविरुद्ध पांढऱ्या चेंडूने सामना खेळला जाणार असला तरी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी लाल ड्यूक चेंडूने फलंदाजीचा सराव केला. आॅफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराटला त्रास होत असल्याने महत्त्वाच्या सामन्याआधी त्याने हा सराव केल्याचे फलंदाजी कोच संजय बांगर यांनी सांगितले.

उभय संघ यातून निवडणार
भाारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक , अजिंक्य रहाणे.
दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्वींटन डिकॉक, डेव्हिड मिलर, जेपी ड्यूमिनी, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर, केशव महाराज, फरहान बेहार्डियेन, ख्रिस मॉरिस, व्हेन पार्नेल, एंडिले पी, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा.

सामना (भारतीय वेळेनुसार) : दुपारी ३ वाजेपासून

Web Title: Today's fire test of Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.