आजच्याच दिवशी 'जंबो'ने उडवली होती पाकिस्तानची दाणादाण
By admin | Published: February 7, 2017 12:56 PM2017-02-07T12:56:06+5:302017-02-07T12:56:06+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी एका जमान्यामध्ये संपूर्ण पाकिस्तानी संघाला पाणी पाजले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी 18 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एकटयाने संपूर्ण पाकिस्तानी संघाला लोळवले होते. 7 फेब्रुवारी 1999 साली दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला स्टेडियमवर अनिल कुंबळे यांनी एक नवा इतिहाल लिहीला. एकाच डावात त्यांनी पाकिस्तानचे सर्वच्या सर्व 10 फलंदाजांना बाद केले. अशी किमया करणारे ते जीम लेकर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे गोलंदाज ठरले.
भारत-पाकिस्तानमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मालिका बरोबरीसाठी भारताला विजय अत्यावश्यक होता. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान ठेवले होते. अंतिम दिवस असल्याने पाकिस्तानचा कसोटी अनिर्णीत ठेवण्याचा प्रयत्न होता. पण कुंबळेंच्या एका धारदार स्पेलसमोर अख्ख्या पाकिस्तानी संघाने लोटांगण घातले. त्यांनी 74 धावांच्या बदल्यात पाकिस्तानच्या 10 गडयांना तंबूची वाट दाखवली. कुंबळेच्या या कामगिरीमुळे भारताला 19 वर्षात पहिल्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवता आला.
महत्वाच म्हणजे या सामन्यात पाकिस्तानच्या सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदी या जोडीने 101 धावांची सलामी दिली होती. कुंबळेच्या गोलंदाजीवर शाहीद आफ्रिदी 41 धावांवर यष्टीरक्षक नयन मोंगियाकडे झेल दिला. त्यानंतर इजाज अहमद, इनझमान उल हक झटपट बाद झाले. 69 धावांवर खेळणारा सईद अन्वर बाद झाला आणि पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानचा डाव 207 धावांवर आटोपला आणि भारताने 212 धावांनी मोठया विजयाची नोंद केली.