पुणे सुपरजायन्ट्सविरुद्ध हैदराबादचे पारडे जड उभय संघांदरम्यान लढत आज

By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

हैदराबाद : सलग तीन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे संघर्ष करीत असलेल्या पुणे सुपरजायन्ट्सविरुद्धच्या लढतीत पारडे वरचढ मानले जात आहे. उभय संघांदरम्यान आज (मंगळवारी) लढत होणार आहे.

Today's match between Pune Super Kings, Hyderabad, | पुणे सुपरजायन्ट्सविरुद्ध हैदराबादचे पारडे जड उभय संघांदरम्यान लढत आज

पुणे सुपरजायन्ट्सविरुद्ध हैदराबादचे पारडे जड उभय संघांदरम्यान लढत आज

Next
दराबाद : सलग तीन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे संघर्ष करीत असलेल्या पुणे सुपरजायन्ट्सविरुद्धच्या लढतीत पारडे वरचढ मानले जात आहे. उभय संघांदरम्यान आज (मंगळवारी) लढत होणार आहे.
सलग दोन सामने गमाविल्यानंतर सनरायझर्स संघाने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून, गुजरात लायन्सचा १० गडी राखून आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पाच गडी राखून पराभव करीत शानदार पुनरागमन केले. हैदराबाद संघ आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत गुणतालिकेत सहा गुणांसह चौथ्या स्थानी आहे. याउलट महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपरजायन्ट्स संघाला पाच सामन्यांत केवळ दोन गुणांची कमाई करता आली असून हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
युवराज सिंग, आशीष नेहरा व केन विल्यम्सन हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असले तरी हैदराबाद संघाने गेल्या तीन सामन्यांत सांघिक कामगिरीच्या जोरावर बाजी मारली. हैदराबादचा कर्णधार व आक्रमक फलंदाज ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर शानदार फॉर्मात आहे. पाच सामन्यांत त्याने चारदा अर्धशतकी खेळी करताना २९४ धावा फटकावल्या आहेत. सर्वाधिक धावा फटकावणार्‍या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर दुसर्‍या स्थानी आहे. अव्वल स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने पाच सामन्यांत ३६७ धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या मोसमातील पहिल्या तीन लढतींमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनला सूर गवसल्यामुळे हैदराबाद संघाला दिलासा मिळाला आहे. धवनने गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद ५३ धावांची, तर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ४५ धावांची खेळी करीत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. हैदराबादच्या फलंदाजांमध्ये मोझेस हेन्रिक्स, इयान मॉर्गन आणि यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा मोक्याच्या क्षणी संघासाठी उपयुक्त योगदान देत आहेत. नेहराच्या अनुपस्थितीत हैदराबादचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यात यशस्वी ठरले आहे. भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करताना पाच सामन्यांत ८ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये तो दुसर्‍या स्थानी आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सर्वाधिक प्रभावित केले आहे. तो व्हेरिएशनच्या आधारावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकित करीत आहे. त्याच्या खात्यावर सात बळींची नोंद आहे. त्याने प्रतिषटक केवळ ५.७५ च्या सरासरीने धावा बहाल केल्या आहेत. याव्यतिरिक्त बरिंदर सरन, दीपक हुडा आणि विपुल शर्मा यांची गोलंदाजीही उल्लेखनीय ठरली आहे. ते काही लढतींमध्ये महागडे ठरले असले तरी गोलंदाज म्हणून त्यांनी आपली छाप कायम राखली आहे.
नवा संघ असलेल्या पुणे सपुरजायन्ट्सला अद्याप संघाचा ताळमेळ साधता आलेला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही तशी कबुली दिली आहे.
स्पर्धेच्या सलामी लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पुणे सुपरजायन्ट्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाब (६ विकेट), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१३ धावा) आणि कोलकाता नाईट रायडर्स (२ विकेट) या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघाला विजयी मार्गावर आणण्यासाठी उत्सुक आहे. धोनीसह स्टीव्हन स्मिथ, फाफ डू प्लेसिस, अजिंक्य रहाणे, थिसारा परेरा यांच्या उपस्थितीत संघाची कामगिरी निराशाजनक ठरत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केव्हिन पीटरसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे पुणे सुपरजायन्ट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. पीटरसनने दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. डू प्लेसिस फॉर्मात असून स्मिथलाही सूर गवसेल, अशी पुणे सुपरजायन्ट्सच्या संघव्यवस्थापनाला आशा आहे. रहाणेने गेल्या लढतीत ६७ धावांची केलेली खेळी अखेर व्यर्थच ठरली. धोनीचे योगदानही उल्लेखनीय ठरत आहे, पण गोलंदाजांना मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज इशांत शर्माला टी-२० स्पेशालिस्ट मानले जात नाही. त्यामुळे संघातील त्याचे स्थान पक्के नसते. परेरा व ॲल्बी मॉर्केल यांच्याकडून संघव्यवस्थापनाला शानदार कामगिरीची आशा आहे. रजत भाटियाने छाप सोडली असली तरी रविंचद्रन आश्विन, मुरुगन आश्विन व अंकित शर्मा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
(वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तारे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.
रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंजिक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, जसकरण सिंग, रविचंद्रन आश्विन, अंकित शर्मा, ॲल्बी मॉर्केल, इरफान पठान, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैंस, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, अशोक डिंडा, दीपक चाहर, स्कॉट बोलँंड, पीटर हैंड्सकोंब आणि ॲडम जम्पा.

Web Title: Today's match between Pune Super Kings, Hyderabad,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.