Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:31 PM2021-08-07T19:31:36+5:302021-08-07T19:32:15+5:30
Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करताना देशाला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले.
Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करताना देशाला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यानं वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर अशी कामगिरी करणारा नीरज हा पहिलाच भारतीय ठरला. आजच्या लढतीत निरजनं पहिल्या दोन प्रयत्नातच ८७ मीटर लांब भालाफेक करून प्रतिस्पर्धी खेळाडूंना गपगार केले. ११ पैकी एकाही प्रतिस्पर्धीला नीरजच्या जवळपासही फिरकता आले नाही. त्यात या लढतीपूर्वी भारत-पाकिस्तान असाही सामना रंगण्याच्या चर्चा होत्या, कारण पाकिस्तानच्या अर्षद नदीमनंही फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण, त्याचे झाले काय?
नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. पाकिस्तानच्या अर्षदनं पहिल्या प्रयत्नात ८२.४०मीटर लांब भाला फेकला.
शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला!
दुसऱ्या प्रयत्नात फाऊल झाल्यानंतर नदीमनं तिसऱ्या प्रयत्नात ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. चौथ्या व पाचव्या प्रयत्नात त्याला अनुक्रमे ८२.९१ व ८१.९८ मीटर लांब भालाफेक करता आले. सहाव्या प्रयत्नात फाऊल झाल्यानं त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फायनलनंतर नदीमनं नीरजचे अभिनंदन केलं आणि पाकिस्तानची माफी मागितली.
Congratulations to my Idol #NeerajChopra for winning 🥇
— Arshad Nadeem 🇵🇰 (@ArshadNadeemPak) August 7, 2021
Sorry Pakistan 🇵🇰 I could not win 🏅 for you.#ArshadNadeem