Tokyo Olympic Kamalpreet Kaur : भारताच्या प्रतिष्ठेसाठी कमलप्रीत कौर झुंजली, पण पदकानं दिली हुलकावणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:38 PM2021-08-02T18:38:39+5:302021-08-02T18:45:41+5:30

महिलांच्या थाळी फेक (Discus Throw) प्रकारात कमलप्रीतनं ऑलिम्पिक पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी केली. कमलप्रीत कौरनं स्पर्धेत ६४ मीटर थाळी फेकत क्वालिफिकेशन फेरीत दुसरं स्थान मिळवलं होतं.

Tokyo Olympic 2020 : Kamalpreet Kaur finishes at 6th spot in Women's Discus Throw with best attempt of 63.70m  | Tokyo Olympic Kamalpreet Kaur : भारताच्या प्रतिष्ठेसाठी कमलप्रीत कौर झुंजली, पण पदकानं दिली हुलकावणी!

Tokyo Olympic Kamalpreet Kaur : भारताच्या प्रतिष्ठेसाठी कमलप्रीत कौर झुंजली, पण पदकानं दिली हुलकावणी!

googlenewsNext

Tokyo Olympic 2020 Kamalpreet Kaur Women's Discus Throw Final : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) थाळी फेकीच्या अंतिम फेरीत इतिहास घडवला. पात्रता फेरीत ६४ मीटर थाळीफेक करणाऱ्या कमलप्रीतला मात्र अंतिम फेरीत अपयश आलं. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

फायनलमध्ये कमलप्रीतसमोर चीनच्या चेन यांगसह जर्मनीच्या तीन खेळाडूंचे कडवे आव्हान होते. चेन हिनं पहिली थाळी फेकून ६२.३१ मीटरचे अंतर पार केले. भारताची कमलप्रीत टॉप १२मध्ये नवव्या क्रमांकावर थाळी फेकण्यासाठी आली. क्रोएशियाच्या सँड्रा पेरकोव्हिचनं ६२.५३ मीटर थाळी फेक करून आघाडी घेतली. जर्मनीच्या क्रिस्टीन पुडेंझनं ६३.०७ मीटर थाळी फेककरून अव्वल स्थान गाठले. कमलप्रीत कौरनं पहिल्या प्रयत्नात ६१.६२ मीटर लांब थाळी फेकली. ( Kamalpreet Kaur throws 61.62m with her first attempt ) पण, क्युबाच्या याईमे पेरेझनं ६५.७२ मीटर लांब थाळी फेकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा धक्का पचण्याआधीच अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमननं ( ALLMAN Valarie) ६८.९८ मीटर लांब थाळी फेकून पहिल्या फेरीअखेरीस ११ वरून थेट अव्वल स्थानावर झेप घेतली. कमलप्रीत सहाव्या स्थानावर राहिली. (After 1st round: Kamalpreet Kaur at 6th spot (61.62m). Junior World Champion Valerie Allman leading the fray with 68.98m.) 

दुसऱ्या प्रयत्नात पोर्तुगालच्या लिलियाना सीएनं कामगिरी उंचावताना ६३.९३ मीटर लांब थाळी फेकली. क्रोएशइयाची सँड्रा आणि इटलीची डेझी ओसाक्यू यांनी फाऊल केला. जर्मनीच्या क्रिस्टीन हिनं दुसऱ्या प्रयत्नात ६५.३४ मीटर थाळीफेक केली. कमलप्रीतनं दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला अन् तिची सातव्या स्थानी घसरण झाली. ( Kamalpreet Kaur's 2nd attempt is foul). पहिल्या प्रयत्नात सर्वात लांब थीळी फेकणाऱ्या ऑलमननं दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला. पावसामुळे खेळाडूंच्या हातातून थाळी निसटताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे १२ पैकी ७ खेळाडूंकडून फाऊस झाले. पावसामुळे स्पर्धेत व्यत्यय आलेला पाहायला मिळाला. टॉवेल टाकून थाळीफेकसाठीचे वर्तुळ सुकवण्याचा प्रयत्न करावा लागला. ( After 2 rounds: Kamalpreet Kaur at 7th spot (61.62m). Junior World Champion Valerie Allman leading the fray with 68.98m.) 

पावसाच्या व्यत्ययानंतर एक तासानं पुन्हा स्पर्धा सुरू झाली. तिसऱ्या प्रयत्नात क्रोएशियाच्या सँड्रानं ६५.०१ मीटर थाळी फेक करून भारताच्या कमलप्रीत कौरला ९व्या स्थानी ढकलले. जर्मनीच्या क्रिस्टीननं ६४.३५ मीटर थाळी फेकली. पण, कमलप्रीतनं ६३.७० थाळी फेकून सहाव्या स्थानी झेप घेतली. पहिल्या तीन प्रयत्नानंतर अव्वल ८ खेळाडूच पुढील तीन प्रयत्नात थाळी फेक करू शकतात. त्यामुळे कमलप्रीतनं एक टप्पा यशस्वीरित्या पार केला. 
चौथ्या प्रयत्नात कमलप्रीतकडून फाऊल झाला. चौथ्या प्रयत्नात केवळ तीन खेळाडूंना यशस्वी थाळीफेक करता आली आणि त्यात क्युबाच्या याईमेनं ६५.२० मीटरसह आघाडी घेतली. पाचव्या प्रयत्नात कमलप्रीतनं ६१.३७ मीटर लांब थाळी फेकली, पण तिची ही कामगिरी तिला पदकाच्या शर्यतीतून बाद करणारी ठरत होती. जर्मनीच्या क्रिस्तीननं चौथ्या फेरीत ६६.८६ मीटर थाळी फेक करत दुसरे स्थान पटकावले आणि ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. अखेरच्या प्रयत्नात भारतीय खेळाडूला पदकासाठी ६६ किंवा त्यापेक्षा अधिक मीटर लांब थाळी फेकणे गरजेचे होते. पण, सहाव्या प्रयत्नात तिच्याकडून फाऊल झाला. 

कोण आहे ही कमलप्रीत कौर?
२०१९ व २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कमलप्रीत कौरला ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २०१८साली तिला पाठीच्या दुखापतीनं त्रासलं होतं आणि त्यामुळे तिला २०१८च्या आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवता आली नव्हती. पंजाबमधील श्री मुख्तार  साहिब जिल्ह्यातील बादल या छोट्याशा गावात कमलप्रीत कौरचा जन्म... तिचे वडील शेती करतात. कमी वयात लग्न करुन देण्याची गावातली परंपरा होती, पण तिला या परंपरेचा भाग व्हायचं नव्हतं. त्याचसोबत तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्यामुळेच तिनं खेळात करिअर करण्याचा निर्धार केला. लहानपणापासून तिला क्रिकेटपटू व्हायचं होतं. ती खेळात उत्तम आहे हे बघून दहावीत असताना तिच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेनं तिला अँथलिट बनण्याचा सल्ला दिला.   
 

Web Title: Tokyo Olympic 2020 : Kamalpreet Kaur finishes at 6th spot in Women's Discus Throw with best attempt of 63.70m 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.