Tokyo Olympic, Mary Kom : खुब लढी मर्दानी; ३८ वर्षीय मेरी कोमचा अटीतटीच्या लढतीत पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:56 PM2021-07-29T15:56:32+5:302021-07-29T16:04:02+5:30
महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते.
Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष हॉकी संघानं अ गटातील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला, तिरंदाजीत अतनू दासनं दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला हार मानण्यास भाग पाडले. पण, आजच्या दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला मोठा धक्का बसला. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरीला पराभवाचा धक्का बसला. ३८ वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली, परंतु भारताच्या दिग्गज बॉक्सरचा प्रवास इथेच संपला.
News Flash:
— India_AllSports (@India_AllSports) July 29, 2021
Mary Kom gave her absolute best before going down to reigning Olympic Bronze medalist Ingrit Valencia by split verdict 2:3 in 2nd round (51kg).
Quite sporting of Mary to welcome the decision with a smile and hugging her opponent. #Tokyo2020withIndia_AllSportspic.twitter.com/IWrgWRMyuW
महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते. इंग्रीटनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपद नावावर केले आहे. पहिल्या फेरीत इंग्रीटनं आक्रमक खेळ करताना ४-१ अशी बाजी मारली. मेरीनं डिफेन्सिव्ह खेळावरच भर दिला. दुसऱ्या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. जबरदस्त पदलालीत्य अन् जोरदार ठोसे मारून मेरीनं प्रतिस्पर्धीला बॅकफूटवर पाठवले. मेरीनं या फेरीत ३-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या फेरीत कडवी टक्कर झाली. पण कोलंबियाची खेळाडू दमलेली पाहायला मिळाली. मेरीच्या आक्रमकतेसमोर तिला तग धरणे अवघड झाले. पण, अखेरच तिनेच बाजी मारली. मेरी कोमचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास इथेच संपला.
मेरीकोमनं सहावेळा जागतिक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. पदकाची दावेदार मानली जाणारी मेरीकोम चार मुलांची आई आहे. त्यातील दोन मुले जुळी. एका मुलाला २०१३ ला जन्म दिला. २०१८ ला मेरीकोमने मुलगी दत्तक घेतली.
दरम्यान, भारताच्या सतीश कुमारनं ९१+किलो वजनी गटात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याच्यावर ४-१ असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिक पदक निश्चित करण्यासाठी सतीशला फक्त एक विजय आवश्यक आहे.
Power 💪
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 29, 2021
Precision ⚡
Punches 🥊
How Satish Kumar played and won his super heavyweight category #boxing match for #IND 🔥👇#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyopic.twitter.com/PmNzNoAoBS
गुरुवारी खेळण्यात आलेल्या राऊंड १६ मध्ये पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ नं पराभव केला. तिरंदाजीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला शूट ऑफमध्ये ६-५ ने पराभूत केले. या विजयासह अतनू दास (Atanu Das) याने पुरुष एकेरीमधील अंतिम १६ खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिनावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले. ४३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरच्या पुरेपूर फायदा उठवत भारताच्या वरुण कुमारने गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.