Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:34 PM2021-08-02T17:34:08+5:302021-08-02T17:44:49+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं सोमवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. तिनं कांस्यपदकाची कमाई करताना सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला. सिंधूनं कांस्यपदक जिंकल्यानंतर मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी तिचे कौतुक केले, परंतु वरिष्ठ खेळाडू सायना नेहवालनं अजूनही सिंधूला अभिनंदन करणारा मॅसेज केलेला नाही. सिंधूनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.
कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. टोकियोतील ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूला विचारण्यात आले की, गोपिचंद आणि सायना यांनी तुझे अभिनंदन केले का? त्यावर सिंधू म्हणाली, हो गोपी सरांनी माझे अभिनंदन केले. मी अजून सोशल मीडिया पाहिलेला नाही. हळुहळू मी सर्वांचे आभार मानेन. गोपी सरांनी मला मॅसेज पाठवला, परंतु सायनाने नाही. आम्ही जास्त बोलतही नाही.''
मागील वर्षी सिंधू तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी लंडनमध्ये गेली होती आणि त्यानंतर तिच्यात व गोपिचंद यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर आले. आपण रिकव्हरी आणि न्यूट्रिशन प्रोग्रामसाठी लंडनला गेल्याचे सिंधूनं त्यानंतर सांगितले. पण, तेथे तिनं गोपिचंद अकादमीत नव्हे तर पार्क तेई-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली गचीबाऊली इंडोर स्टेडियममध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या व गोपिचंद यांच्या वादाच्या वृत्तांना बळ मिळाले.