Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून लोकांचा जीव वाचवला; आता थेट गोल्डवरच साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 03:30 PM2021-07-25T15:30:47+5:302021-07-25T15:31:08+5:30
'तो' स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची भूमिका पार पाडत होता.
टोकियो - कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. प्रत्येक जण कोरोना महामारीचा सामना करत आहे. या महामारीने लाखो जणांचा जीव घेतला आहे. कोरोनामुळेच टोकियो ओलिम्पिकदेखील (Tokyo Olympics 2020) 2021 पर्यंत स्थगित करण्यात आले होते. या काळात अधिकांश खेळाडू कठोर निर्बंध असतानाही ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असतानाच एक नेमबाज मात्र, टोकियो ऑलिम्पिकची तयारी सोडून कोरोनापासून लोकांचा जीव वाचविण्यात व्यस्त होता. पण, याच नेमबाजाने आता कमाल करत थेट गोल्ड मेडललाच गवसणी घातली आहे. त्याने गोल्ड मेडल पटकावले आहे. (Tokyo Olympics 2020 Javad foroughi wins gold in the air pistol final in Tokyo olympics)
10 मीटर एअर पिस्टलच्या या इराणी ऑलिम्पिक चॅम्पियनचे नाव आहे, जावेद फोरोगी. तो स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची आपली भूमिका पार पाडत होता.
Priya Malik: रेसलर प्रिया मलिकने इतिहास रचला; मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
फोरोगी इराणचा पहिला चॅम्पियन -
फोरोगी 41 वर्षांचा आहे. त्याने शनिवारी 244.5 गुणांसह ओलिम्पिक विक्रम करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) जिंकले. या स्पर्धेत भारताचा सौरभ चौधरीही होता. मात्र, तो क्वालिफिकेशनमध्ये शीर्षस्थानी असूनही फायनलमध्ये सातव्या स्थानावर घसरला. फोरोगी म्हणाला, की मी अत्यंत आनंदी आहे, की मी पिस्टल आणि रायफलमध्ये इराणचा पहिला चॅम्पियन आहे.
Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज
गेल्या वर्षी मीही संक्रमित झालो होतो -
फोरोगी म्हणाला, यापूर्वी इराणने कधीही ऑलिम्पिकमध्ये कुठलेही पदक जिंकले नव्हते आणि मी थेट सुवर्णपदक जिंकले आहे. मी अत्यंत आनंदी आहे. मी देशाचा सैनिक म्हणून चांगले काम केले आहे. मी नर्स आहे आणि रुग्णालयात काम करतो. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात मी रुग्णालयात काम केले आहे. गेल्या वर्षी मीही संक्रमित झालो होतो. कारण मी रुग्णालयात काम करत होतो. आजारातून बरे झाल्यानंतर मी तयारी सुरू केली होती.