Tokyo olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता, आयोजन समितीच्या प्रमुखांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:29 PM2021-07-20T20:29:59+5:302021-07-20T20:31:33+5:30
Tokyo olympics 2020: जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. कारण तसे संकेतच आयोजित समितीच्या प्रमुखांनी दिले आहेत.
Tokyo olympics 2020: जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. कारण तसे संकेतच आयोजित समितीच्या प्रमुखांनी दिले आहेत. स्पर्धेच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि खेळाडू संकटात सापडले तर स्पर्धा रद्द केली जाऊ शकते, असं विधान स्पर्धेच्या आयोजन समितीचे प्रमुख तोशिरो मुटो यांनी केलं आहे. (Tokyo olympics 2020 still can be cancelled indicates organizing committee chief Toshiro Muto)
ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात तोशिरो यांनी महत्वाचं विधान केलं. कोरोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याच्या विचारात आहात का? असं विचारलं असता त्यांनी उत्तरात स्पष्टपणे नकार दिला नाही. "कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीवर आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर आयोजन समिती यावर विचार करेल आणि सध्याची स्थिती लक्षात घेता आम्ही नक्कीच आयोजकांच्या बैठकीत यावर चर्चा करणार आहोत. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे असं लक्षात येईल तेव्हा स्पर्धा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल", अशा स्पष्ट शब्दांत तोशिरो यांनी स्पर्धेच्या भवितव्याबाबत संकेत दिले आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच टोकियोमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय क्रिडाग्राममध्येही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. १ जुलैपासून आतापर्यंत जपानमध्ये ऑलिम्पिकशी निगडीत व्यक्तींमध्ये एकूण ६७ जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. टोकियोमध्ये २० जुलै रोजी कोरोनाचे १३८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. येत्या काळात जेव्हा सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मुख्य स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतील तेव्हा कोरोनाची स्थिती कशी असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोरोनामुळे यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे. दरम्यान, स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी आशा एका प्रवक्त्यानं वर्तवली आहे.